Gunratna Sadavarte in Bigg Boss Hindi 18 : प्रचंड लोकप्रियतेनंतर ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याच दिवशी ‘बिग बॉस हिंदी १८’ चे प्रिमिअर आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते दिसणार आहेत. त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली आहे.
बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वातील १८ सदस्यांपैकी एक गुणरत्न सदावर्ते आहेत. “हम सदावर्ते हैं, आगे आगे देखो होता है क्या,” अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली. या शोमध्ये जाण्याबाबत दडपण आहे का? असं विचारल्यावर ते म्हणाले, “हमारा नाम ही काफी है, हमारा नाम गुणरत्न है.”
हेही वाचा – दिग्दर्शकाने सर्वांसमोर कानाखाली मारली अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
“लोक मला घाबरतात, कारण मी थेट बोलतो डरते, त्यामुळे मी कोणाला भीत नाही,” असं ते म्हणाले. “बिग बॉसच्या घरात आमच्यासमोर कोणती लढाईच होणार नाही,” असं त्यांनी नमूद केलं. बिग बॉसच्या घरात किती दिवस राहणार, ट्रॉफी जिंकणार का, असं विचारल्यावर म्हणाले, गोष्ट हारणं किंवा जिंकणं ही नाही तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची असते.
बिग बॉसच्या घरात काही वाद झाल्यास गुणरत्न सदावर्ते शोमधून बाहेर आल्यावर त्या लोकांविरोधात केसेस करणार का? असा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर ते हसले. “माझा नेहमीचा युक्तीवाद जो असतो, तो सर्वसामान्यांना माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असे लोक असतील, यांच्याबरोबरचं काही असेल तर या गोष्टी घडतात. कारण तो लोकांच्या जीवन-मरणाशी खेळण्याचा विषय आहे. सामान्यांबरोबर, त्यातल्या त्यात शोच्या स्पर्धकांबरोबर भावाभावाचं नातं असतं,” असं ते म्हणाले. म्हणजेच बिग बॉसमध्ये स्पर्धकांबरोबर वाद झाल्यास तक्रारी वगैरे करणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
गुणरत्न सदावर्ते यांनी ते बिग बॉसमध्ये जाणार असल्याचं सांगितलं आहे, पण चॅनलने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.