‘पवित्र रिश्ता’ ही टीव्हीवरील प्रचंड गाजलेली मालिका. २००९ मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने पाच वर्षे म्हणजेच २०१४ पर्यंत प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं. यात अंकिता लोखंडेने अर्चना ही भूमिका साकारली होती, तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मानव नावाची भूमिका केली होती. अर्चना व मानवचं लग्न, त्यांच्या लग्नानंतर आयुष्यात येणाऱ्या अडचणी यावर आधारित ही कौटुंबिक मालिका होती. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या मालिकेने खूप लोकप्रियता मिळवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेशमधील इंदूर इथं शशिकांत लोखंडे व वंदना फडणीस या मराठी जोडप्याच्या घरी झाला होता. अंकिता राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होती, पण पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाची आवड जोपासण्यासाठी ती २००५ मध्ये मुंबईला गेली. ‘पवित्र रिश्ता’ ही तिची मुख्य भूमिका असलेली मालिका. ही मालिका इतकी हिट ठरली की या मालिकेतील कलाकारांना घरोघरी ओखळलं जाऊ लागलं. तब्बल पाच वर्षे या मालिकेत काम करणाऱ्या अंकितालाही खूप प्रसिद्धी मिळाली, पण पुढच्या आयुष्यात मात्र तिला या प्रसिद्धीचा फार फायदा झाला नाही. या मालिकेच्याच सेटवर तिची व सुशांत सिंह राजपूत यांची भेट झाली, दोघांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सात वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. सुशांतने ही मालिका संपण्यापूर्वीच सोडली होती. त्यामुळे मालिका संपली त्यानंतरच्या काही वर्षांवर नजर टाकल्यास असं दिसून येतं की सुशांतने ‘काय पो चे’मधून बॉलीवूड पदार्पण केलं. त्यानंतर त्याने काही उत्तम चित्रपट केले, पण अंकिताच्या बाबतीत मात्र असं घडलं नाही.

अंकिता लोखंडेची सुशांतशी ब्रेकअपनंतर झालेली ‘अशी’ अवस्था, म्हणाली, “मी विकीला म्हणायचे की तो…”

खरं तर इथे अंकिता किंवा सुशांतची तुलना करण्याचा हेतू नाही. पण एकाच मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या दोन कलाकारांना नंतर मिळालेल्या संधीबद्दल सांगण्याचा हा प्रयत्न आहे. एकीकडे सुशांतने बॉलीवूडमध्ये काम मिळवलं, यश मिळवलं तर दुसरीकडे अंकिताला मात्र ‘पवित्र रिश्ता’ संपल्यानंतर पाच वर्षांनी कंगना रणौतचा चित्रपट मिळाला. ‘मणिकर्णिका’ असं या चित्रपटाचं नाव. कंगनाबरोबर काम करूनही अंकिताला पुढे चित्रपट किंवा मालिका मिळाल्या का? तर नाही. बॉलीवूडमध्ये काम मिळत नसल्याबद्दल खुद्द अंकितानेही खंत व्यक्त केली होती.

“आईने माझे व सुशांतचे सगळे फोटो फाडले,” अंकिता लोखंडेचा खुलासा; म्हणाली, “नंतर सहा महिन्यांनी…”

अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात कंगना रणौतबरोबर काम केलं होतं. या चित्रपटात तिने ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारली होती. तिची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण, नंतर मात्र तिला पुन्हा अशी भूमिकाच ऑफर झाली नाही. ‘बॉलीवूड लाईफ’शी बोलताना अंकिताने म्हटलं होतं की इंडस्ट्रीत तिचा कुणी गॉडफादर नाही. ती प्रतिभावान आहे, पण नकार द्यायला तिच्याकडे कामच येत नाही. “अभिनयाचं मार्केट खूप वेगळं आहे. लोक म्हणतात की त्यांना चांगल्या ऑफर्स मिळत नाहीत, त्यामुळे ते नकार देतात. पण माझ्या बाबतीत असं काहीही घडलं नाही. माझ्याकडे अशी कोणतीही ऑफर नाही जी मी नाकारू शकेन आणि मी कामासाठी दुसरीकडे जाऊ शकत नाही,” असं अंकिताने म्हटलं होतं.

‘बाजीराव मस्तानी’ भयंकर चित्रपट आहे, असं पेशव्यांच्या वंशजांना का वाटतं? जाणून घ्या

दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातही अंकिता लोखंडेला अपयश आलं. तिचं सुशांतबरोबर ब्रेकअप झालं. त्यानंतर तिच्या आयुष्यात विकी जैनची एंट्री झाली. ती विकीबरोबर असताना २०२० मध्ये सुशांतने आत्महत्या केली. त्यानंतर जवळपास दीड वर्षांनी म्हणजेच डिसेंबर २०२१ मध्ये तिने विकीशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती विकीबरोबर ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. पण तिला चित्रपट किंवा सीरिज, अथवा मालिका मिळाल्या नाहीत. तिने ‘बागी ३’ मध्ये एक छोटीशी भूमिका केली होती. लग्नानंतर जवळपास दोन वर्षांनी ती ‘बिग बॉस १७’ मध्ये पतीबरोबर आली. पण अंकिताच्या करिअरवर नजर टाकल्यास असं दिसून येतं की जवळपास १५ वर्षांपूर्वी एवढ्या मोठ्या सुपरहिट मालिकेतून पदार्पण करूनही तिला काम मिळालं नाही. दीड दशकं इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या अंकिताला इतकी लोकप्रियता मिळवून, प्रचंड फॅन फॉलोइंग असूनही चाळीशीच्या उंबरठ्यावर असताना ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावं लागलं. या शोनंतर तिला काही काम मिळेल की नाही हे येत्या काळात कळेलच, पण तिच्या पहिल्या मालिकेइतकं तिचं करिअर यशस्वी झालं नाही, हे मात्र नक्की!

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday ankita lokhande career after superhit serial pavitra rishta personal life sushant singh rajput vikki jain bigg boss 17 hrc