अभिनय क्षेत्रातील कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष व वेगवेगळे किस्से कायमच चर्चेत असतात. काही कलाकरांचं खासगी आयुष्ये तर एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी असतात. त्यांच्या आयुष्यातील घटना, वादग्रस्त किस्से हे त्यांच्या अभिनयापेक्षाही जास्त चर्चिले जातात. असंच एक नाव म्हणजे अभिनेता विंदू दारा सिंह होय. विंदू यांचा आज ६ मे रोजी ५९ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही रंजक किस्से जाणून घेऊयात.
विंदू दारा सिंह यांनी टीव्ही मालिका व चित्रपटांमध्येही काम केलंय. अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात कार्यरत असलेल्या या अभिनेत्याला चित्रपटांमध्ये अपेक्षित ओळख मिळाली नाही. पण मालिकेतील एका भूमिकेने त्यांना जनमाणसांत लोकप्रिय केलं. त्यांनी १९९४ मध्ये ‘करण’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. वडील दारा सिंग दिग्दर्शित ‘रब दिया रक्खा’, सलमानसोबत ‘गर्व’, ‘मैने प्यार क्यूं किया’ आणि ‘पार्टनर’ सारख्या चित्रपटांत भूमिका केल्या. चित्रपटांमध्ये हवं तसं यश न मिळाल्याने त्यांनी टीव्हीवर हनुमानाचे पात्र साकारले. हे पात्र त्यांच्या आजपर्यंतच्या सर्वात लोकप्रिय भूमिकांपैकी एक ठरलं. ‘जय वीर हनुमान’ या टीव्ही मालिकेत विंदू यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. टीव्हीवर सर्वाधिक काळ हनुमानाची भूमिका साकारणारे विंदू दारा सिंह आहेत, त्यांनीच एका मुलाखतीत असा दावा केला होता.
विंदू यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी १९९६ साली तब्बूची बहीण फराह नाझशी पहिलं लग्न केलं होतं. त्यांना फतेह नावाचा मुलगा झाला. मात्र अवघ्या सहा वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, विंदू यांनी २००६मध्ये डीना उमरोव्हाशी लग्नगाठ बांधली. दुसरीकडे फराह यांनीही सुमीत सहगलशी दुसरं लग्न केलं. विंदू दारा सिंह ‘बिग बॉस सीझन ३’ चे विजेते आहेत. त्यांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू असताना २०१३ मध्ये त्यांचे नाव आयपीएल मॅच फिक्सिंगशी जोडले गेले. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्यांना अटकही झाली होती, पण नंतर स्थानिक कोर्टातून जामीन मिळाला. ते अखेरचे विक्रांत मॅसीच्या ‘फॉरेन्सिक’ चित्रपटात दिसले होते.