‘फादर्स डे’निमित्त आज कलाकार मंडळी आपल्या वडिलांबाबत विविध पोस्ट शेअर करत आहेत. तसेच वडिलांवर आपलं किती प्रेम आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. आता अशाच एका अभिनेत्रीने तिच्या वडिलांबाबत शेअर केलेला अनुभव अगदी डोळ्यांत पाणी आणणारा आहे. ‘फादर्स डे’निमित्त ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री स्नेहन शिदमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
स्नेहल विलेपार्ले येथील एका चाळीमध्ये राहते. तिने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत वडिलांबाबत भाष्य केलं. यावेळी तिचे वडीलही तिच्याबरोबर उपस्थित होते. लेक संपूर्ण प्रवास सांगत आहे हे ऐकून त्यांनाही रडू कोसळलं. स्नेहलने तिच्या वडिलांनी कशाप्रकारे कष्ट केले हेही सांगितलं. स्नेहल म्हणाली, “बाबा कधीकधी आम्हाला त्यांचा संपूर्ण प्रवास सांगतात. गावावरुन ते मुंबईमध्ये पळून आले. कारण गावची त्यांची परिस्थिती खूपच वाईट होती. मुंबईमध्ये आल्यानंतर राहायला जागा नव्हती, रस्त्यावर झोपायचे, दुसऱ्यांच्या घरी काही दिवस राहायचे असं सगळं ते सांगतात”.
“आता या सगळ्या गोष्टी ते गंमतीने सांगतात. पण तेव्हा त्यांची परिस्थिती खूप बिकट होती. आई-बाबांचा प्रेमविवाह आहे. दोघंही एकाच चाळीमध्ये राहायला होते. दोन वेळेचं जेवण मिळेल की नाही अशी बाबांची परिस्थिती होती. शिवाय आई लहान वयापासूनच घरकाम करायची. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात काम करायला मी सुरुवात केली तेव्हा मी आईला सांगितलं की, तू आता घरकाम करायचं नाही”.
“आई घरकाम करते म्हणून लाज वाटेल यासाठी मी तिला हे सांगितलं नाही. त्यांनी आता आराम करावा हाच माझा उद्देश आहे. मधल्या काळात आम्हाला काही कारणामुळे आमचं राहतं घर विकावं लागलं. त्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहायला लागलो. दोघांनी मिळून इतके कष्ट केले की, त्यांनी आम्ही राहत असलेल्या चाळीतचं पुन्हा स्वतःचं घर विकत घेतलं. मला आई-वडिलांकडे बघून अगदी भारी वाटतं की, कोणत्याही परिस्थितीमध्ये दोघं थकत नाहीत”. स्नेहल व तिच्या आई-वडिलांचा हा संपूर्ण प्रवास खरंच थक्क करणारा आहे.