‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सातत्याने चर्चेत आहे. ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता हार्दिक जोशीच्या केळवणाचा फोटो समोर आला आहे. या फोटोतून लग्नाच्या तारखेबद्दल खुलासा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या केळवणाचे आणि बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले होते. त्यानंतर हल्लीच अक्षया देवधरचा नववधूच्या वेशातील एक व्हिडीओ देखील समोर आला होता. त्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट करत कधी लग्न करताय? असा प्रश्न विचारला होता. पण नुकतंच हार्दिक जोशीच्या एका मैत्रिणीने पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी
हार्दिक जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. हार्दिकने नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला त्याने ‘घरचं केळवण’ असे कॅप्शन दिले आहे. यात तो छान पारंपारिक वेशात दिसत आहे. तर त्याच्या समोर छान पंचपक्वानांनी भरलेले ताट पाहायला मिळत आहे. त्या ताटाभोवती छान सजावट केली असून रांगोळीही काढल्याचे पाहायला मिळत आहे.
हार्दिकच्या एका मैत्रिणीने शनिवारी २६ नोव्हेंबरला इन्स्टाग्राम स्टेटसवर हा फोटो शेअर केला होता. यात तिने हार्दिक जोशीला टॅग केले होते. त्याबरोबरच ‘फक्त ६ दिवस शिल्लक’ असा हॅशटॅगही शेअर केला होता. तिचा हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोनंतर अनेक चाहत्यांनी लग्नाच्या तारखेचा अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : हिरवा चुडा, हातभर मेहंदी आणि साजश्रृंगार करत सजल्या पाठकबाई, अक्षया देवधरचा नववधूच्या वेशातील व्हिडीओ समोर
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या १ किंवा २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते दोघेही पुण्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे दोघे ज्या ठिकाणी विवाहबद्ध झाले, तिथेच हार्दिक आणि अक्षया लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.