अभिनेता हार्दिक जोशीला घराघरांत राणादा म्हणून ओळखलं जातं. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. सध्या हार्दिक ‘झी मराठी’च्या ‘जाऊ बाई गावात’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा कार्यक्रम स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं.
हार्दिक म्हणाला, “‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप जवळचा आणि महत्त्वाचा आहे. शो स्वीकारण्यापूर्वी माझी वाहिनी खूप आजारी होती त्यामुळे सुरुवातीला या मी शोमधून माघार घेणार होतो आणि नकार कळवणार होतो. पण, जेव्हा याबद्दल माझ्या वहिनीला समजलं तेव्हा रुग्णालयात तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि माझ्याकडून वचन घेतलं की, काही झालं तरी तू हा शो सोडायचा नाहीस.”
हेही वाचा : स्मृती इराणींनी मासिक पाळीबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘झिम्मा २’चे कलाकार म्हणाले, “महिलांना चार दिवस…”
हार्दिक पुढे म्हणाला, “‘जाऊ बाई गावात’ हा शो फक्त मी माझ्या वहिनीसाठी करतो आहे. याचा पहिला एपिसोड योगायोगाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण, तो पहिला भाग पाहण्यासाठी ती या जगात नव्हती. आता मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिला नमस्कार करून आणि तिची आठवण काढत करतो.”
एका सूत्रसंचालकाची भूमिका निभावताना मी कुठे कमी तर पडणार नाही याची सतत मला काळजी घ्यावी लागते असंही हार्दिकने यावेळी सांगितलं. दरम्यान, ‘जाऊ बाई गावात’ हा रिअॅलिटी शो ४ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोमवार ते शनिवारी रात्री ९.३० वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं. सध्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ‘जाऊ बाई गावात’ने आता टीआरपीच्या शर्यतीत एन्ट्री घेतली आहे.