Hardeek Joshi : अभिनेता हार्दिक जोशीने नुकतीच त्याच्या दिवगंत वहिनीच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या मोठ्या वहिनीचं गेल्यावर्षी निधन झालं. हार्दिकला अनेक प्रसंगांमध्ये त्याच्या वहिनीने खंबीरपणे साथ दिली होती. त्यामुळे आपल्या वहिनीची उणीव अभिनेत्याला कायम भासत असते. आज तिच्या आठवणीत हार्दिकने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

हार्दिक लिहितो, “ज्योती वहिनी… आज २४ नोव्हेंबर तुला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं. पण, आजही तुझी उणीव सतत जाणवते आणि ती कायम जाणवत राहणार, तुझ्या गोड आठवणी तुझं अस्तित्व आणि तुझा आशीर्वाद कायम आमच्या बरोबर आहेत आणि कायम आमच्या बरोबर राहणार… Always miss you and always love you ज्योती वहिनी”

हेही वाचा : अरुंधती अनिरुद्धला घराबाहेर काढणार अन् तोंडावर…! ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या अंतिम भागात काय घडणार? पाहा जबरदस्त प्रोमो

हार्दिकची भावुक पोस्ट त्याची पत्नी अक्षयाने देखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर केली आहे. या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी दु:ख व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिय दिल्या आहेत.

…तेव्हा वहिनीमुळे शो स्वीकारला

हार्दिकने गेल्यावर्षी ‘जाऊ बाई गावात’ या शोमधून ‘झी मराठी’वर पुनरागमन केलं होतं. हा शो त्याच्यासाठी अत्यंत जवळचा होता कारण, या शोची ऑफर आली तेव्हा अभिनेत्याची वहिनी खूप आजारी होती. पण, केवळ तिला दिलेल्या वचनामुळे हार्दिकने शो करण्यासाठी होकार दिला. त्याचा हा शो महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय झाला होता.

हेही वाचा : टेम्पोने मारलेली धडक अन्…; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये ‘असा’ शूट झाला अपघाताचा सीन; वल्लरीने शेअर केला व्हिडीओ

याबद्दल हार्दिकने सांगितलं होतं की, “जाऊ बाई गावात’ हा शो फक्त मी माझ्या वहिनीसाठी केला. याचा पहिला एपिसोड योगायोगाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला. पण, तो पहिला भाग पाहण्यासाठी ती या जगात नव्हती. आता मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिला नमस्कार करून आणि तिची आठवण काढत करतो.”

दरम्यान, हार्दिकच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने साकारलेल्या राणादा पात्राने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. म्हणूनच मालिका संपून एवढी वर्षे उलटूनही संपूर्ण महाराष्ट्रात हार्दिक-अक्षयाला ‘राणादा’ आणि ‘पाठकबाई’ या नावाने ओळखलं जातं.