‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका १८ मार्चपासून सुरू होणार आहेत. रेश्मा शिंदे, सविता प्रभूणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अभिनीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. तर शिवानी बावकर, आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता ‘स्टार प्रवाह’वरील कोणत्या जुन्या मालिका ऑफ एअर होणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची वेळ जाहीर होताच ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी चर्चा सुरू झाली. पण असं काही न होता ‘आई कुठे काय करते’ मालिकेची वेळ बदलण्यात आली. १८ मार्चपासून लाडकी अरुंधती दुपारी २.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण कोणती जुनी मालिका ऑफ एअर होणार? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.
सुत्राच्या माहितीनुसार, ‘स्टार प्रवाह’वरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १८ जुलै २०२३ला सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस उतरली. अभिनेत्री शर्वरी जोगने गुंजा तर अभिनेता हर्षद अतकरीने कबीर ही भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच गुंजा आणि कबीरच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण एक वर्षही न होता ही मालिका आता ऑफ होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेची जागा ‘साधी माणसं’ ही नवी मालिका घेणार आहे. या मालिकेत शिवानी ‘मीरा’ तर आकाश ‘सत्या’च्या भूमिकेत झळकणार आहे. मीरा ही फुलविक्रेती आहे, तर सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचा भिन्न स्वभाव आहे. आता या दोघांची भेट कशी होणार? नियती यांच्याबरोबर काय करणार? हे या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.