‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’. या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं असून एजे आणि लीला ही प्रेक्षकांची लाडकी जोडी झाली आहे. या मालिकेतील एजे, लीला व्यतिरिक्त इतर पात्र घराघरात पोहोचली आहेत. नुकतंच लीलाला ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मीने खास गोष्ट दिली आहे. ज्याचा फोटो सध्या चर्चेत आला आहे.
लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांचा महासंगम होणार आहे. १५ ते १६ मार्चपर्यंत संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० पर्यंत हा महासंगम असणार आहे. ‘झी मराठी’च्या सर्व मालिकांमधील खलनायिका नायिकांच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पण, नायिका खलनायिकांची दृष्ट प्रवृत्ती जाळणार की नाही हे महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे. याचनिमित्ताने ‘झी मराठी’च्या सर्व मालिकांमधील कलाकार एकमेकांना भेटले. याचे रील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अलीकडेच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराजने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मी म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकरने वल्लरीला खास छोटा केक दिलेला पाहायला मिळत आहे. वल्लरीने याचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत हर्षदा खानविलकरचे आभार मानले आहेत. तसंच तिने लिहिलं आहे, “तू माझा दिवस खूप छान बनवलास.” वल्लरीची हीच इन्स्टाग्रामवर स्टोरी हर्षदाने शेअर केली आणि लिहिलं, “तू सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा. अजून बरंच काही करायचं आहे.”
दरम्यान, वल्लरी विराजला एका वृत्तसंस्थेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यत आलं. वल्लरीच्या कामाबद्दल बोलायचं झालंय तर तिने मराठीसह हिंदीतील मालिका, चित्रपटात काम केलं आहे. गेल्यावर्षी तिचा ‘कन्नी’ मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वल्लरीच्या सोबतीला अभिनेत्री हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत हे कलाकार झळकले होते. याशिवाय वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे. वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. Bath and Barks असं तिच्या सलून नाव आहे. दादरमधील गोखले रोड येथे वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. बरेच मराठी कलाकार आपल्या प्राण्यांचं ग्रुमिंग करण्यासाठी वल्लरीच्या ग्रुमिंग सलूनमध्ये घेऊन जातात. अभिनयाबरोबर वल्लरी हा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळते.