अभिनेत्री हर्षदा खानविलकर(Harshada Khanvilkar) यांची टेलिव्हिजनच्या जगतात एक वेगळी ओळख आहे. त्यांनी निभावलेली पात्रे दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिली असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘पुढचं पाऊल’मधील आक्कासाहेब हे त्यांचे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सध्या हर्षदा खानविलकर लक्ष्मी निवास या मालिकेतून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकेतील त्यांचे लक्ष्मी हे पात्र आतापर्यंत साकारलेल्या पात्रांपेक्षा वेगळे आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी रिजेक्शनबाबत वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला वाटतं सतत रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे”

हर्षदा खानविलकर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रिजेक्शन कधीच कोणाला चुकलं नाहीये, तू रिजेक्शनला कधी सामोरी गेली आहेस का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना हर्षदा खानविलकर यांनी म्हटले, “मला वाटतं सतत रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. मला कोणीच कधी अभिनेत्री मानलं नाही. मला वाटत नाही की, पूर्वी कधी माझं अभिनेत्रींमध्ये नाव घेतलं गेलं आहे. ‘पुढचं पाऊल’नंतर टेलिव्हिजननं मला अभिनेत्री म्हणून कदाचित संधी देण्यास सुरुवात केली. टेलिव्हिजननं खरंच मला १०-१५ वर्षात खूप लाडावलं आहे. एक तर प्रत्येक शो देवाच्या कृपेनं जास्तीत जास्त काळ चाललाय. कमीत कमी हजार भाग तर होतातच. ‘पुढचं पाऊल’ सहा वर्षं चाललं. ‘रंग माझा वेगळा’ चार वर्षं चाललं. आता मी जो शो करत होते, तो वर्षभर करून मी इथे आले. तर मला असं वाटतं की, ती कृपा देवाची आणि आई-वडिलांची आहेच.”

“मी पूर्वी जाहिरातीच्या ऑडिशन दिल्यात. मी कायम रिजेक्ट झालेले आहे. खरं तर मी ऑडिशन देऊन रिजेक्टच झालेले आहे. मी काम करत असते. शो चालू असतात. पण मी खूप ऑडिशन देते. वेब शो, जाहिरातीसाठी ऑडिशन देत असते. आता तर पूर्वीसारखं काही बाहेर जावं लागत नाही, घरूनही ऑडिशन देता येते. मी ९० टक्के वेळा रिजेक्ट झालेली आहे. १० टक्के वेळा असं होतं की, तारखा मॅच होत नाहीयेत किंवा पैशाचं जुळत नाहीये; पण मी रिजेक्टच झाले आहे.”

दरम्यान, हर्षदा खानविलकर साकारत असलेल्या भूमिका कायमच लोकप्रिय ठरल्या असल्याचे पाहायला मिळते. सध्या त्या लक्ष्मी या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील त्यांची ही भूमिका अत्यंत साधी, प्रेमळ, समजूतदार, मध्यमवर्गीय घरातील कुटुंबासाठी काही स्वप्ने असणारी, अशी आहे. त्यांची ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshada khanvilkar on rejection says my name has never been mentioned among actresses before nsp