‘झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांआधीच ‘लक्ष्मी निवास’ ही मल्टीस्टारर कौटुंबिक मालिका सुरू झाली. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर प्रमुख भूमिका साकारत आहेत. प्रेक्षकांचा सुद्धा या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नेहमीच भारदस्त, अनेकदा खलनायिकेच्या भूमिका साकारणाऱ्या हर्षदा खानविलकरांना आयुष्यात एकदा तरी सोज्वळ भूमिका करायची होती. याशिवाय वयाच्या चाळीशीत करिअरला खऱ्या अर्थाने वळण कसं आलं याबद्दल अभिनेत्रीने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…
हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “मला असं वाटतं सबका टाइम आता है… तुमच्या नशिबात जे लिहिलेलं असतं ते तुम्हाला नक्कीच मिळतं. फक्त ती वेळ यावी लागते. जेव्हा अलीकडेच इंडस्ट्रीत आलेले माझे लहान मित्र-मैत्रिणी मला काम मिळत नाहीये सांगतात, तेव्हा मी त्यांना हेच सांगते. विश्वास ठेवा वेळ लागेल पण, गोष्टी तुम्हाला मिळतील. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळणं खूप महत्त्वाचं असतं.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “माझ्याही आयुष्यात तो काळ आला, जेव्हा अभिनेत्री म्हणून मला काम मिळत नव्हतं. पण, तेव्हाच संजय आणि माझी नुकतीच मैत्री झाली होती… त्याला प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं होतं. मग मी म्हणाले ठीक आहे करूयात…त्याचं स्वप्न कसं पूर्ण होतंय हे पाहण्यासाठी मी त्याच्याबरोबर जॉईन झाले. मग आम्ही ‘चेकमेट’ बनवला, ‘बेधुंद मनाच्या लहरी’ नावाची मालिका बनवली, तेव्हा मला अभिनेत्री म्हणून काम नव्हतं. पण, जो तो तुम्हाला भूक देतो, तो तुमच्या अन्नाची तरतूद करतो. सांगायचा उद्देश असा की, अभिनेत्री म्हणून माझ्याकडे काम नव्हतं पण, अचानक प्रोडक्शन हाऊस सुरू झालं. त्यामुळे माझं घर चालत होतं.”
“माझ्या घरात माझी आई लक्ष्मी आहे. माझी आई ५१ वर्षांची होती तेव्हा माझे वडील गेले. त्यानंतर घरात माझी आई, बहीण आणि मी… आम्ही तिघींनी एकमेकींना खूप साथ दिली. त्याकाळात मी प्रोडक्शनचं काम करायचे. मी गेली ३० वर्षे काम करतेय. माझ्या करिअरला खरं वळण ‘पुढचं पाऊल’ मालिकेमुळे मिळालं. तेव्हा मी वयाच्या चाळीशीत होते. मी ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिका भारदस्तच होत्या. अक्कासाहेब असो किंवा ‘रंग माझा वेगळा’ मधली सौंदर्या असो…पण, या सगळ्यात साधी, सोज्वळ भूमिका मला कोणीच ऑफर केली नव्हती. याला कारणीभूत अर्थात माझं स्वत:चं व्यक्तिमत्व सुद्धा होतं. मी नेहमीच बोलायचे माझ्या वाट्याला सोज्वळ, सोशिक भूमिका आली पाहिजे. मग त्यानंतर माझ्या वाट्याला ‘लक्ष्मी’ हे पात्र आलं” असं हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं.
लक्ष्मीच्या भूमिकेविषयी…
‘लक्ष्मी निवास’बद्दल हर्षदा खानविलकर पुढे म्हणाल्या, “झी मराठी वाहिनी आणि निर्मात्यांकडून मला फोन आला. एक कन्नड मालिका आहे त्याचा एक एपिसोड तू बघ… मी एपिसोडू पाहून पुन्हा फोन केला आणि म्हणाले…तुमचं काहीतरी चुकतंय, तू मला चुकीचा फोन केलाय. तर, तो म्हणाला नाही असं नाहीये…तुम्हाला ही भूमिका करायला आवडेल का? यावर मी म्हणाले, एकतर या भूमिकेत मी बसत नाहीये असं मला वाटतं, भूमिका करायला मला नक्की आवडेल. इथून या गोष्टी सुरू झाल्या. माझ्या ‘नाही’ म्हणण्यापासून आणि सुनील भोसले ( निर्माते ) म्हणत होते आपण प्रयत्न करूयात. ही प्रक्रिया लगेच होणार नव्हती. या मालिकेसाठी मी ऑडिशन दिली…तीन सीन केले. मला एकदा असंही लक्षात आलं की, ऑडिशन चांगली झालेली नाहीये. पण, सर्वांना विश्वास होता की, मी ही भूमिका केली पाहिजे. त्यानंतर तुषार दादाबरोबर माझा सीन शूट करण्यात आला. ही ३-४ महिन्यांची प्रक्रिया होती. काही दिवसांनी मग ‘लक्ष्मी निवास’साठी मला लॉक करण्यात आलं.”