वाहतूक कोंडी ही मुंबईतील सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईसह ठाणेकरांना मेट्रो स्थानकांची आणि रस्त्यांची सुरु असलेली कामं यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा आपण नियोजित स्थळी दिलेल्या वेळेत पोहोचू शकत नाही आणि महत्त्वाची कामेही रखडतात. सामान्य माणसांप्रमाणे मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनादेखील वाहतूक कोंडीमुळे त्रास होतो. यापूर्वी अभिजीत खांडकेकर, हेमंत ढोमे, सागर तळाशीकर या अभिनेत्यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत भाष्य केलं होतं.
हेही वाचा : विमानात अभिनेत्रीबरोबर घडला धक्कादायक प्रकार, मद्यधुंद सहप्रवाशाने केलं गैरवर्तन, पोस्ट शेअर करत म्हणाली…
आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने फेसबुक पोस्ट शेअर करत वाहतूक कोंडीवर उपाय काय? असा संतप्त सवाल केला आहे. नम्रता तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “काय करायचं घोडबंदर रोडचं , loaded ट्रक टेम्पो पलटी होतायत साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते किमान 95% प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडलाय त्याचाही थांगपत्ता लागत नाही कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय .. सुखसोयी असलेले मोठमोठाले टॉवर झालेत खरं पण सुखाचा प्रवास कसा होईल ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रोचं काम चालू आहे पण ती सुद्धा गायमुखपर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिकला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला 2 ते 3 तास लागतात. काय होऊ शकतं ह्यावर”
हेही वाचा : “तो फार नशीबवान…” ‘केजीएफ’ स्टार यशबद्दल रवी तेजाने केलेलं वक्तव्य चर्चेत; अभिनेत्याचे चाहते नाराज
नम्रताची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर असंख्य प्रतिक्रिया देत अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. एका युजरने कमेंटमध्ये, “आपण फक्त मनातल्या मनात संताप करू शकतो. अजून काय?” असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजर्सनी तिच्या या पोस्टवर “घोडबंदररोडला कोणी वाली, सुग्रीव नाही. स्वतःच्या जबाबदारीवर प्रवास करायचा एवढेच सर्वांच्या हाती”, “राजकारणी नेते निगर गट्ट आहेत
त्यांना सामान्य जनतेची अजिबातच तमा नाही”, अशा संतप्त कमेंट्स करत अभिनेत्रीने हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, नम्रता संभेरावच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री हास्यजत्रा कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. लवकरच ती ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.