‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले. अभिनेता निखिल बनेलाही या कार्यक्रमामुळे घराघरांत एका वेगळी ओळख मिळाली. लवकरच हा विनोदवीर बहुचर्चित ‘बॉईज ४’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘बॉईज ४’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात अभिनेत्याने मीडियाशी संवाद साधताना वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
हेही वाचा : “३६ दिवस, १३ शहरं अन्…”, संकर्षण कऱ्हाडेचा ‘असा’ होता अमेरिका दौरा; म्हणाला, “नाटकाच्या प्रयोगांना…”
“निखिल बनेला तुला रस्त्यात आडनावाने बने अशी हाक मारतात का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “हो…मला भर रस्त्यात सगळे बिनधास्त बने अशी हाक मारतात. मी त्यांचा भाऊ किंवा घरातील कोणीतरी आहे असे समजून लोकं मला हाक मारतात. मला बऱ्याचवेळा असा अनुभव आला आहे.”
“चाहते एवढ्या प्रेमाने हाक मारतात हे ऐकून मला पण भारी वाटतं. माझ्या घराशेजारी मला कोणी पाहिलं, तर त्यांना सुरूवातीला विश्वास बसत नाही? अनेकांनी मला ‘तू हास्यजत्रामधील बने आहेस ना…मग तू इथे राहतोस का?’ असंही विचारलं आहे. मी घराजवळ हाल्फ पॅंट घालून फिरत असतो, त्यामुळे लोकांच्या मनात नक्की मीच आहे ना? असा विचार करून गोंधळ निर्माण होतो. पण, प्रत्येक माणसाने असंच राहिलं पाहिजे शेवटी आपलं काम महत्त्वाचं असतं.”, असं निखिल बनेने सांगितलं.
हेही वाचा : “टोल कुणाच्या खिशात जातोय?” तेजस्विनी पंडितने शेअर केला फडणवीसांचा व्हिडीओ; म्हणाली, “राजसाहेब तुम्हीच…”
दरम्यान, ‘बॉईज ४’ चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखिल बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीश कुलकर्णी, यतिन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.