संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ सीरिजची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. १ मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली. मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, शर्मिन सेगल, रिचा चड्ढा, संजीदा शेख या अभिनेत्रींनी ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. सध्या ‘हीरामंडी’त ‘बिब्बोजान’ने केलेल्या ‘गजगामिनी वॉक’ची सर्वत्र चर्चा चालू आहे.
‘हीरामंडी’ सीरिज प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्रींचे पोशाख, भरजरी दागिने, वेशभूषा याहून अधिक सध्या अदिती राव हैदरी म्हणजे ‘हीरामंडी’त मुजरा करताना ‘बिब्बोजान’ने केलेल्या ‘गजगामिनी वॉक’ची भुरळ सर्वांना पडली आहे. अदितीने तिच्या ठुमकदार नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “सैयां हटो जाओ…” गाण्यातील बिब्बोजानची मोहून टाकणारी ‘गजगामिनी चाल’ पाहून सध्या अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कलाकारांनी ही चाल रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. पण, सध्या एका मराठी अभिनेत्रीने अदितीचं पाहून रिक्रिएट केलेल्या ‘गजगामिनी वॉक’ची चांगलीच चर्चा होत आहे.
बिब्बोजानच्या ‘गजगामिनी वॉक’वर चाहते चांगलेच फिदा झाले आहे. सध्या इन्स्टाग्रामवर या वॉकचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. महिलावर्गाकडून अदितीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. याआधी मधुबाला आणि माधुरी दीक्षित यांनी देखील चित्रपटांमध्ये ‘गजगामिनी चाल’ केली होती. पण, अर्थातच सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अदिती या सगळ्यात वरचढ ठरली.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री कांची शिंदेने अदिती राव हैदरीचा हा ‘गजगामिनी वॉक’ हुबेहूब रिक्रिएट केला आहे. मोठे कानातले, नाकात नथ, लांबलचक वेली, काळ्या रंगाचा ब्लाऊज, लाल रंगाचा घागरा त्यावर सोनेरी ओढणी असा अदितीसारखा लूक कांचीने या व्हिडीओमध्ये केला आहे. या व्हिडीओमध्ये अदितीप्रमाणे कांची सुद्धा पाठमोरी चालत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कांचीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेता किरण गायकवाड, अभिनेत्री अनघा अतुल यांनी या कलाकारांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. याशिवाय “तू या ट्रेंडमध्ये जिंकली”, गजगामिनी ट्रेंडमध्ये तू जिंकलीस, “पहिल्यांदाच कोणतीही हा ट्रेंड एवढा छान फॉलो केलाय”, “बिब्बोजानसारखा लूक मस्तच”, “एकदम हिरोईन” असा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd