Hemant Dhome : आपल्या ठसकेबाज लावणी नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. ‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ अशी तिची वेगळी ओळख आहे. गौतमीचं नृत्यकौशल्य हे जगजाहीर आहेच. तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आपल्या नृत्याने मनोरंजन करणारी ही नृत्यांगना आता छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. गौतमी लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरुन एका नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘स्टार प्रवाह’वर २६ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
हेमंत ढोमेकडून गौतमी पाटीलचं कौतुक
या कार्यक्रमात गौतमी पाटील देखील सहभागी होणार आहे. आजवर आपल्या नृत्य कौशल्याने सर्वांचं मनोरंजन करणारी गौतमी आता या शोमधून तिचं पाककौशल्य दाखवण्यास सज्ज झाली आहे. २६ एप्रिल म्हणजेच आजपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोच्या पहिल्याच भागात अभिनेता हेमंत ढोमे सहभागी झाला आहे आणि त्याने या शोच्या निमित्ताने गौतमीचं कौतुक केलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर गौतमीबरोबरचे खास फोटो शेअर पोस्ट शेअर केली आहे.
“आता तुझ्याबरोबर मलाही शोज करावे लागणार बहूतेक”
या पोस्टसह त्याने असं म्हटलं आहे की, “पाटलांची नवी जोडी. सबसे कातिल हेमंत ढोमे-पाटील बरोबर शेफ गौतमी पाटील! हे मी का म्हणतोय यासाठी तुम्हाला… अमेय वाघ या माझ्या मित्राचा नवा कोरा शो ‘शिट्टी वाजली रे’ बघावाच लागेल… मनोरंजनाचा हा वाघ तिथे लय धुमाकूळ घालतोय. दोन भागांसाठी हक्काने आणि प्रेमाने पाहूणा म्हणून जायचा योग आला! पण खूप खूप मज्जा आली! गौतमी भेटूच लवकरच. आता तुझ्याबरोबर मलाही शोज करावे लागणार बहूतेक.”
गौतमीचं पाककौशल्य पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “स्टार प्रवाह या आपल्या घरच्या चॅनलने आणि आपल्या लाडक्या लोकांनी तुम्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जबरदस्त कार्यक्रम आणला आहे. तुमचं धमाल मनोरंजन होणार हे नक्की.” हेमंतच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईकस आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच या नवीन शोसाठी उत्सुकताही व्यक्त केली आहे. गौतमीचं नृत्यकौशल्य महाराष्ट्रालं काही नवीन नाही, पण आता ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून तिचं पाककौशल्य पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात कलाकारांची मांदियाळी
दरम्यान, ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातील स्पर्धकांना टास्क करत करत पदार्थ बनवायचे आहेत. याशिवाय प्रतिस्पर्धी स्पर्धकांना हरवून प्रेक्षकांचे मनोरंजनही करायचे आहे. निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक, स्मिता गोंदकर, पुष्कर श्रोत्री, छोटा पुढारी, रुपाली भोसले असे अनेक कलाकार आहेत. अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून ‘पूर्णब्रह्म’ रेस्टॉरण्टच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.