‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम हीना खानला तिसर्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत याबद्दल माहिती दिली होती. हीना तिचा या प्रवासातील प्रत्येक टप्पा चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतेय. आता हीनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये तिचे केस कापले जातायत.
हीनाने शेअर केलेल्या या व्हिडीओत, हीना केस कापण्यासाठी खुर्चीवर बसली असताना तिची आई रडताना दिसतेय. हीना तिच्या आईला समजावते आणि म्हणते, “हे फक्त केस आहेत, ते पुन्हा वाढतील. तूदेखील केस कापतेस ना मग ते वाढतात. आता तू स्वत:ला त्रास करून घेऊ नकोस. नाही तर तुझी तब्येत बिघडेल.”
त्यानंतर हीना पहिल्यांदा स्वत:चे केस कापते. त्यानंतर केशकर्तनकार तिचे केस कापतो. हा व्हिडीओ शेअर करीत अभिनेत्रीने एक सुंदर कॅप्शन दिलं आहे. हीनाने लिहिलं, “माझ्या आईनं ज्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता, ती गोष्ट तिच्या डोळ्यांसमोर घडतेय. म्हणून या व्हिडीओत माझ्या आईचा काश्मिरी भाषेतला आवाज तुम्हाला ऐकू येत असेल.”
हीनाने पुढे लिहिलं, “तिथल्या सर्व सुंदर लोकांसाठी, विशेषत: स्त्रियासांठी ज्या माझ्यासारखीच लढाई लढत आहेत. मला माहीत आहे की, हे कठीण आहे. मला माहीत आहे की, आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपले केस हा एक प्रकारे मुकुटच आहे; जो आपण कधीही काढत नाही. पण, जर तुम्हाला अशा कठीण लढाईला सामोरं जावं लागत असेल, जिथे तुम्हाला तुमचे केस, तुमचा अभिमान, तुमचा मुकुट गमवावा लागेल; पण जर तुम्हाला जिंकायचं असेल, तर तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात आणि मी जिंकणं हा निर्णय निवडलाय.”
“ही लढाई जिंकण्यासाठी मी स्वतःला प्रत्येक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. माझे सुंदर केस गळण्याच्या आधीच मी ते कापण्याचा निर्णय घेतला आहे. मला हा मानसिक त्रास आठवडाभर सहन करायचा नव्हता. म्हणून मी हा माझा केसांचा मुकुट सोडायचा निर्णय घेतला. कारण- मला समजलंय की, माझा खरा मुकुट हे माझं धैर्य, माझी शक्ती व माझं स्वतःवर असलेलं प्रेम आहे आणि हो, या टप्प्यासाठी मी माझे स्वतःचे केस एक छान विग बनविण्यासाठी वापरण्याचे ठरवले आहे”, असंही हीनाने लिहिलं.
हेही वाचा… सोनाक्षी सिन्हाने शेअर केले हनिमूनचे रोमॅंटिक फोटो, पती झहीर इक्बालबरोबर घालवला ‘असा’ वेळ
हीनाने पुढे लिहिलं, “केस परत वाढतील, भुवया परत येतील, डाग फिकट होतील; परंतु तुमचा आत्मविश्वास कायम राहिला पाहिजे. माझा हा प्रयत्न तिथल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा यासाठी मी माझी स्टोरी, माझा प्रवास रेकॉर्ड करीत आहे. माझ्या या स्टोरीमुळे एखाद्याचा अनुभव अधिक चांगला होत असेल, तर ते खरंच फायदेशीर आहे. तसंच जे माझ्या या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यांच्याशिवाय माझा हा दिवस अशा प्रकारे जाऊच शकला नसता.”
“देव आमचे दुःख कमी करो आणि आम्हाला विजयी होण्याचे सामर्थ्य देवो. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा”, असं लिहित हीनाने तिच्या आई आणि मित्रपरिवाराचे आभार मानले. तसंच हीनानं तिच्या केशकर्तनकाराचेही आभार मानले.