हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे हिना प्रचंड चर्चेत आली. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत साकारलेल्या ‘कोमोलिका’ या पात्रामुळे अभिनेत्रीला विशेष पसंती मिळाली. हिंदी कलाविश्वात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असूनही हिना खानच्या ट्विटर अकाऊंटला ब्लू टिक नाही. अलीकडेच अभिनेत्रीने ट्विटर अकाऊंटच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनबाबत भाष्य करत आपले स्पष्ट मत मांडले आहे.
हिना खानला नुकताच एका ट्विटर युजरने “ब्लू टिक (Blue Tick ) विकत घे, नाहीतर तुझे ट्विटर एका फेक अकाऊंटप्रमाणे दिसेल.” असा सल्ला दिला होता. याला उत्तर देताना अभिनेत्री लिहिते, “माझ्या कामात मी प्रचंड मेहनत करते आणि त्या मेहनतीमुळेच आज या कलाविश्वात माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हेच माझ्या आयुष्याचे व्हेरिफिकेशन आहे. एका ब्लू टिकमुळे नव्हे तर लोक मला माझ्या कामामुळे ओळखतात.”
हेही वाचा : “आमच्या नाटकाची बस…”, टोलच्या समस्येनंतर मुंबई-पुणे महामार्गावर ऋजुता देशमुखला आला ‘असा’ अनुभव
हिना खान पुढे लिहिते, “जरी उद्या इन्स्टाग्रामने माझे ब्लू टिक काढून टाकले तरीही मला काहीच फरक पडणार नाही. माझ्या चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. माझे आयुष्य एका ब्लू टिकमुळे थांबणार नाही आणि मी पैसे देऊन ब्लू टिक घेणार नाही.”
हेही वाचा : “भरलेलं नाट्यगृह, प्रेक्षकांचं प्रेम अन्…”, प्रिया बापटने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “यापेक्षा सुखद अनुभव…”
दरम्यान, हिना खानने ट्विटर युजर आणि तिच्यात झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्रीने ब्लू टिकबद्दल स्पष्ट मत मांडल्याबद्दल अनेक नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने “हिना, तुला तुझी ओळख सिद्ध करण्यासाठी कोणत्याही ब्लू टिकची आवश्यकता नाही.” अशी कमेंट या पोस्टवर केली आहे.