‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेता ऋषिकेश शेलार घराघरांत पोहोचला. मराठी मनोरंजनसृष्टीत त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच त्याने ‘राजश्री मराठी’च्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ऋषिकेशने दिवंगत अभिनेते इरफान खान यांना फोन केला होता. त्याने त्यांच्याशी नेमका काय संवाद साधला? जाणून घेऊयात…
ऋषिकेश शेलार दिवंगत अभिनेते इरफान खान यांना फोन करून म्हणाला, “नमस्कार, इरफान कसा आहेस माझ्या भावा? माझ्यासारख्या असंख्य अभिनेत्यांना तू मोठ्या भावासारखा आहेस. तू फार लवकर गेलास पण, आमच्यामध्ये आजही तू आहेस…आमच्या सगळ्यांमध्ये आज एक-एक इरफान आहे आणि हीच तुझी खरी ताकद आहे. तू जयपूरचा अन् कोण कुठला मी सांगलीचा एक मुलगा…तू गेल्यानंतर खूप रडलो. माझ्यासारखे असंख्य लोक त्यादिवशी रडले असतील.”
“इरफान तू कॅमेराचा एक वेगळा दृष्टीकोन दाखवून दिलास म्हणून आज ग्रेट आहेस. तू दाखवलेल्या वाटेवरून पुढे जाणं हे आता सोपं वाटतंय पण, ज्या पद्धतीचं काम तू केलंस त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. तुझ्यासारखं काम करणं खरंच अवघड आहे. स्वत:वरचा विश्वास ढळू न देता तू वेगळं काम करत राहिलास आणि आज लोक बोलतात इरफान खान साहेबांसारखं काम करा…ही किती मोठी गोष्ट आहे.” हे सांगताना ऋषिकेश काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : उमेश कामत-प्रिया बापट यांच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाचा आगामी प्रयोग रद्द, कारण सांगत म्हणाले…
शेवटी हा आभासी फोन ठेवताना ऋषिकेश शेलार म्हणाला, “या जन्मात आपली भेट होऊ शकली नाही ही खंत माझ्या मनात कायम राहणार! तू नेहमी म्हणतोस ना, ‘जहाँ जायेगा वहीं रौशनी लुटाएगा किसी चराग़ का अपना मकाँ नहीं होता’ तू तिथेही सर्वांना प्रकाश देत असशील. तुझ्या नावावरून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलंय, त्यामुळे तिच्या डोळ्यात मी जेव्हा-जेव्हा बघेन… तेव्हा मला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. मी कधीच पाट्या टाकणार नाही.”