ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर मानसिक छळाचे आणि जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या आयएएस अधिकारी असलेल्या पूर्वाश्रमीच्या पत्नी स्मिता घाटे भारद्वाज यांनी यासंदर्भात त्यांची बाजू मांडली आणि नितीश यांनी मुलींच्या संगोपणासाठी कधीच आर्थिक मदत केली नाही, असा दावा केला आहे.
त्यांच्या पत्नीने माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिलंय की. “नितीश भारद्वाज चार वर्षांत फक्त तीन वेळा वैयक्तिकरित्या त्यांच्या मुलींना भेटले आहेत. मी ऑक्टोबर २०१८ आणि २०१९ मध्ये माझ्या मुलींना आणि त्यांच्या वडिलांना भेटायला मुंबईला घेऊन गेले होते, तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्या घरात राहण्याची परवानगी नाकारली आणि मला व माझ्या मुलींना स्वखर्चाने हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले. मी मुलींना कधीच त्यांच्या वडिलांना भेटण्यापासून रोखलेलं नाही.”
मुलींच्या शाळेच्या निवड प्रक्रियेत गैरहजर
“जून २०२३ मध्ये स्काईप कॉल दरम्यान मुलींनी नितीश यांनी भोपाळला यावं अशी इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी व्यग्र असल्याचं सांगून येणं टाळलं. इतकंच नाही तर ते २०१५ पासून ते २०१७ आणि २०२१ मध्ये मुलींच्या शाळेच्या निवड प्रक्रियेतही गैरहजर राहिले. त्यांनी पालक म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्यांकडे सतत दुर्लक्ष केले. अनेकदा असंही आढळून आलंय की ते मुली व माझ्याशी बोलताना संभाषण रेकॉर्ड करायचे. कोणते वडील किंवा पती गुप्तपणे कॉल रेकॉर्ड करतात? ५-६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीतील त्यांनी केलेले कॉल रेकॉर्डिंग हे लग्न संपवण्याच्या पूर्वनियोजित हेतूचे लक्षण आहे,” असं स्मिता भारद्वाज यांनी लिहिलंय.
सहानुभूती मिळविण्यासाठी खोटे आरोप – स्मिता भारद्वाज
“१४ फेब्रुवारी २०२४ रोजी भोपाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक खोटे आरोप करत मीडिया कव्हरेजद्वारे सामाजिक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी मुलींची परीक्षा सुरू झाली होती आणि त्यांच्या या कृत्यामुळे मुली शाळेत जाताना माध्यमं त्यांचा पाठलाग करत होती, दोन्ही मुलींचे फुटेज घेण्यासाठी रस्त्यावर मीडियाचे कॅमेरे लावण्यात आले होते, हे कितपत योग्य आहे?” असा सवाल स्मिता यांनी केला आहे.
‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…
नितीश भारद्वाज यांनी आर्थिक मदत केली नाही – स्मिता भारद्वाज
“मुलींच्या जन्मापासून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या संगोपनाच्या खर्चासाठी, शाळेच्या फीसाठी किंवा त्यांच्या विकासास हातभार लावणाऱ्या इतर कोणत्याही कामासाठी आर्थिक मदत दिलेली नाही. कायदेशीर बंधनं असूनही त्यांनी कधीच मुलींसाठी आर्थिक मदत केली नाही. यावरूनच त्यांना मुलींच्या भविष्याची किती चिंता आहे ते दिसून येतंय,” असं त्या म्हणाल्या.
नितीश भारद्वाज १७ फेब्रुवारी रोजी मुलींना भेटले
“१७ फेब्रुवारी २०२४ रोजी स्मिता, त्यांच्या जुळ्या मुली आणि नितीश भारद्वाज यांच्यात त्यांच्या घरी भेट झाली. ३० मिनिटांच्या बैठकीमध्ये एक तपास अधिकारी आणि इतर काही जण उपस्थित होते. यावेळी नितीश यांचे मुलींबरोबरचे संभाषण अनेक प्रश्नांनी भरलेले होते. मुलींबद्दल काळजी आणि सहानुभूती दाखवण्याऐवजी ते त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रे आणि ईमेलचा पुरावा मागत होते. त्यांनी मुलींना कठीण प्रश्न विचारून आणि कायदेशीर उत्तरांसाठी दबाव टाकून त्रास दिला. या संपूर्ण प्रकारामुळे मुली रडू लागल्या,” असंही स्मिता भारद्वाज यांनी म्हटलंय.