India vs New Zealand Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड सुरू आहे. जगातील टॉप-८ संघांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आज अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना खेळला जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा टॉस गमावला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे रोहित शर्माने सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ वेळा टॉस हरण्याचा रेकॉर्ड केला आहे. यावरच मराठी अभिनेत्याने मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कर्णधार रोहित शर्माने सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस हरून ब्रायन लाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ब्रायन लाराने १९९८-९९ दरम्यान सलग १२ वेळा एकदिवसी सामन्यांमध्ये टॉस गमावला होता. या यादीत नदरलँडचा पीटर बोरेनचं देखील नाव सामील आहे. त्याने कर्णधार म्हणून ११ वेळा टॉस गमावला होता. आता भारतीय संघाच्या नावापुढे १२ वेळा टॉस हरण्याचा रेकॉर्ड जोडला गेला आहे. भारताने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग १५ टॉस गमावले आहेत, त्यापैकी १२ टॉस रोहित शर्माने गमावले आहेत.
आजच्या सामन्यातील व्हिडीओ शेअर करून मराठी अभिनेता सौरभ चौघुलेने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये रोहित शर्मा बोलताना दिसत आहे. या व्हिडीओवर सौरभने लिहिलं आहे, “चला टॉस हरलो…परंपरा…प्रतिष्ठा…अनुशासन.” त्यानंतर त्याने ‘मोहब्बतें’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा स्किटर शेअर केला आहे. सौरभ चौघुलेच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, सौरभ चौघुले कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेली मल्हारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेनंतर सौरभ लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री योगिता चव्हाणशी त्याने लग्नगाठ बांधली. यानंतर सौरभ एका हिंदी मालिकेत आणि अल्बम साँगमध्ये झळकला.
काही दिवसांपूर्वी सौरभ पत्नी योगितासह इंडोनेशियातील बाली येथे फिरायला गेला होता. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने दोघं बालीमध्ये फिरायला गेले होते. याचे फोटो दोघांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.