इंडियन आयडलच्या १५ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. मानसी घोष या पर्वाची विजेती ठरली. शुभोजीत चक्रवर्ती फर्स्ट रनरअप आणि स्नेहा शंकर सेकंड रनरअप ठरले. या पर्वाची विजेती ठरल्यानंतर मानसीला २५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. आता हा शो जिंकल्यानंतर मानसीने बॉलीवूडमधील पहिल्या गाण्याबद्दल वक्तव्य केले आहे.
या गाण्याचे रेकॉर्डिंग आधीच…
इंडियन आयडलच्या परीक्षकपदी श्रेया घोषाल, बादशाह आणि विशाल ददलानी हे लोकप्रिय गायक होते. त्यांच्याबद्दल मानसी घोष म्हणाली, “मी विशाल सर आणि बादशाह सरांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा कायम विचार केला. श्रेया घोषाल यांच्या कमेंट्सदेखील चांगल्या असायच्या. पण, विशाल सर जे बोलायचे ते तोंडावर बोलायचे. जेव्हा त्यांना माझे गाणे आवडायचे, तेव्हा माझ्यासाठी उठून टाळ्या वाजवणारे ते पहिले असायचे.” इंडियन आयडल या शोबाबत मानसी म्हणाली, “या शोने मला गोष्टी विसरायला आणि पुन्हा नव्याने शिकायला अशा दोन्ही गोष्टी शिकवल्या आहेत. जरी तुम्हाला तुमच्या गाण्यासाठी चांगला अभिप्राय मिळाला नाही, तरीसुद्धा त्याचं ओझं घेऊन तुम्ही पुढचा परफॉर्मन्स करू शकत नाही. जे काही घडलं ते विसरून तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागते.”
भारतीय संगीतावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव पडला आहे का? यावर बोलताना मानसी घोष म्हणाली, “पाश्चात्य संगीताचा प्रभाव असणे वाईट आहे असे मी म्हणणार नाही. आम्ही आजही लता मंगेशकर, भीमसेन जोशी, झाकिर हुसैन आणि इतर सर्वांना ऐकतो. आम्ही मायकेल जॅक्सनलादेखील ऐकायचो आणि आता आम्ही डोजा कॅटलासुद्धा ऐकतो. हे चांगले आहे. किंबहुना पाश्चात्य देशातील लोकांना आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताची जाणीव आहे आणि ते लोक हे संगीत ऐकतात. भारतातील रॅप कलाकार जगभरात पोहोचत आहेत, त्यामुळे भारतीय संगीत हे जगभर पोहोचत आहे.”
जे गाण्याच्या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना सल्ला देताना मानसी म्हणाली, “आज खूप गायक आहेत, पण जर तुम्ही एखाद्या गुरूकडे गेलात तर त्यांचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला प्लेबॅक गाण्याची कधी संधी मिळेल याची वाट बघत बसू शकत नाही. स्वत:वर काम करा. मला बॉलीवू़डसाठी गायचे आहे, पण याचबरोबरच माझे स्वतंत्र गाण्याचे काही प्लॅनदेखील आहेत.”
मानसी बॉलीवूडमधील पदार्पणाबद्दल म्हणाली, “मी ललित पंडित सर आणि शान सर यांच्याबरोबर गाणे गायले आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग आधीच पूर्ण झाले आहे. एका आगामी चित्रपटासाठी आम्ही गाणे गायले आहे. बादशाह सर आणि मी येणाऱ्या काळात एकत्र काम करणार आहोत.”