Indian Idol Season 15: ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘इंडियल आयडल’चं १५वं पर्व अंतिम टप्यापर्यंत पोहोचलं आहे. सध्या सेमी फिनाले सुरू आहे. आतापर्यंत ‘इंडियल आयडल’च्या १५व्या पर्वाचे टॉप-८ स्पर्धक भेटले आहेत. यामध्ये स्नेहा शंकर, अनिरुद्ध सुवाराम, मायस्कम बासू, प्रियांशू दत्त, चैतन्य देवढे (माऊली), सुभाजित चक्रवर्ती, रागिणी शिंदे आहे. या टॉप-८मधील कोणता स्पर्धक ‘इंडियन आयडल १५’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण सध्या आळंदीच्या चैतन्य देवढेच्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चैतन्य देवढे लहानपणापासून आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. आतादेखील चैतन्य आपल्या आवाजाने ‘इंडियन आयडल १५’मध्ये परीक्षकांना अचंबित करताना पाहायला मिळत आहे. नुकताच चैतन्यचा एका प्रोमो ‘सोनी टीव्ही’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याचे आई-वडील कौतुक करताना दिसत आहेत. तसंच परीक्षक चैतन्यने गायलेलं गाणं ऐकून भारावलेले पाहायला मिळत आहेत.
या प्रोमोमध्ये, बऱ्याच दिवसांनी लेका पाहून चैतन्यची आई भावुक झालेली दिसत आहे. त्यानंतर चैतन्यची आई लेकाविषयी सांगते, “चैतन्य तू आमच्यावर नाराज असशील ना? कारण सगळ्यांचे आई-वडील कार्यक्रमात येऊन पाठिंबा देत असतात. पण, आम्ही तिथे नाही आहोत.” पुढे त्या परीक्षकांना सांगतात की, तो इतका समजूतदार आहे. तो आम्हाला म्हणाला, तुमच्यावर सर्व गुरुकुलची जबाबदारी आहे. मी इथे स्वतःला सांभाळेन. त्यानंतर चैतन्यचे वडील म्हणतात की, गेली १८ वर्षे मी त्याला कधी शाबासकी दिली नाही आणि त्यांचे अश्रू अनावर होतात. हे पाहून श्रेया घोषालदेखील भावुक होते.
नंतर चैतन्य अरिजीत सिंगचं ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘देवा देवा’ गाणं गातो. आळंदीच्या माऊलीने गायलेलं हे गाणं ऐकून परीक्षक श्रेया घोषाल, विशाल ददलानी अचंबित होतात. विशाल ददलानी चैतनच्या जबरदस्त परफॉर्मन्स पाहून म्हणतो, “तोडून टाकलंस.” सध्या चैतन्य देवढेचा हा प्रोमो खूप चर्चेत आला आहे.
दरम्यान, चैतन्य देवढेने ‘इंडियन आयडल १५’ आधी मराठीमधील अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. ‘संगीत सम्राट’, ‘राइझिंग स्टार’, ‘सूर नवा ध्यास नवा’, ‘इंडियन आयडल मराठी’ आणि ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमांमध्ये तो पाहायला मिळाला होता. लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत चैतन्यला लाँच केलं. त्यांच्या ‘लकी’ चित्रपटात चैतन्यला गाण्याची संधी दिली. ‘लकी’ चित्रपटातील ‘माझ्या दिलाचो’ गाणं चैतन्य देवढेने गायलं. त्याचं हे गाणं सुपरहिट ठरलं.