Indian Idol Season 15: म्युझिक रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’चं १५ वं पर्व सध्या खूप चर्चेत आहे. हे पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. एकूण सहा स्पर्धक या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. चैतन्य देवढे, स्नेहा शंकर, शुभोजित चक्रवर्ती, प्रियांशु दत्ता, मानसी घोष व अनिरुद्ध सुस्वरम या सहा जणांमधून ‘इंडियन आयडॉल’च्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण होतंय? हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, गेल्या आठवड्यातील आळंदीच्या चैतन्य देवढेचा परफॉर्मन्स पाहून श्रेषा घोषाल भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
‘इंडियन आयडॉल’च्या १५ व्या पर्वात गेल्या शनिवारी डबल एलिमिनेशन झालं. मिस्मी बोसू व रागिणी शिंदे या दोघी जणी ‘इंडियन आयडॉल १५’मधून बाहेर झाल्या. याच भागात चैतन्य देवढेचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्याचा परफॉर्मन्स पाहून परीक्षक भारावून गेले. चैतन्यच्या याच परफॉर्मन्सचं सध्या नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
‘सोनी टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर चैतन्य देवढेच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘सैराट’ चित्रपटातील अजय गोगावलेनं गायलेलं ‘याडं लागलं’ गाणं आणि ‘धडक’ चित्रपटातील अजयचं ‘पहली बार’ ही दोन गाणी आळंदीस्थित १८ वर्षांचा चैतन्य एकत्र गाताना दिसत आहे. चैतन्यच्या आवाजात ही दोन्ही गाणी ऐकल्यावर परीक्षकांना अक्षरशः गहिवरून आले. यावेळी बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरदेखील उपस्थित होता. करणही चैतन्यचं गाणं ऐकून भारावून गेला. एवढंच नाही तर चैतन्यचा आवाज ऐकून शेवटी श्रेया घोषाल भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिला अश्रू अनावर झाले इतका जबरदस्त परफॉर्मन्स चैतन्य देवढेने केला.
चैतन्य देवढेच्या परफॉर्मन्सच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. “अप्रतिम”, “येक नंबर चैतन्य भाऊ”, “भावा, तुझ्या आवाजात काय जादू आहे…भन्नाट”, “निकाल काहीही असू दे; परंतु आमच्यासाठी माऊली तू विजेता आहेस”, “तूच विजेता होणार”, “सेम टू सेम अजय-अतुल सर”, “चैतन्य आवाज ऐकून अंगावर शहारे आले”, अशा अनेक प्रकारच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दरम्यान, चैतन्य देवढे ‘इंडियन आयडॉल १५’च्या आधी मराठीमधील अनेक कार्यक्रमांत सहभागी झाला होता. ‘संगीत सम्राट’, ‘रायझिंग स्टार’, ‘सूर नवा ध्यास नवा’, ‘इंडियन आयडॉल मराठी’ व ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमांमध्ये त्याच्या सूरांची सरगम ऐकायला मिळाली होती. लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत चैतन्यला लाँच केलं. त्यांच्या ‘लकी’ चित्रपटात चैतन्यला गाण्याची संधी दिली. ‘लकी’ चित्रपटातील ‘माझ्या दिलाचो’ हे चैतन्य देवढेनं गायलेलं; जे गाणं सुपरहिट ठरलं.