Indian Idol 15 Winner: लोकप्रिय म्युझिक रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’च्या १५व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ एप्रिलला पार पडला. कोलकाताच्या मानसी घोषला ( Manasi Ghosh ) विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. वयाच्या २४ वर्षी मानसीने ‘इंडियन आयडल १५’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर शुभोजीत चक्रवर्ती दुसऱ्या स्थानावरून बाद झाला. मानसीला २५ लाख रुपयांचा धनादेश बक्षीस स्वरुपात देण्यात आलं. तसंच एक कार आणि बॉश कडून गिफ्ट हँपर दिलं. सुरुवातीपासून मानसी घोष विजेती होणार असं म्हटलं जात होतं. ट्रेंडिंग पोलमध्ये देखील ती अव्वल स्थानावर होती.
मानसी घोषबरोबर टॉप-३मध्ये शुभोजीत चक्रवर्ती आणि स्नेहा शंकर पोहोचले होते. एकाबाजूला सुमधूर आवाज आणि दमदार परफॉर्मेन्सने मानसीने ‘इंडियन आयडल १५’चा खिताब जिंकला. तर शुभोजीत चक्रवर्ती फर्स्ट रनरअप ठरला आणि स्नेहा शंकर सेकंड रनरअप झाली. या दोघांना चॅनेलकडून ५-५ लाखांचा धनादेश देण्यात आला. तसंच आळंदीच्या चैतन्य देवढे, प्रियांशु दत्ता या दोघांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना विजेती मानसी घोष म्हणाली, “महाअंतिम सोहळ्यात माझं कुटुंब उपस्थित राहिलं होतं. माझं कुटुंब रडत होतं. मला प्रोत्साहन देत होतं. मला कळतं नाही, या विजयावर काय बोलू. पण आम्ही सगळे खूप आनंदी आहोत. आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदललं आहे. मला सर्वांकडून खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत. मी माझ्या बक्षीसातील काही रक्कम माझ्या स्वतंत्र संगीतावर खर्च करेन आणि बाकीची रक्कम मी वापरणाऱ्या कारवर करणार आहे.” ‘इंडियन आयडल १५’ची ट्रॉफीवर जिंकणारी मानसी फक्त २४ वर्षांची असून ती कोलकातामधील पाइकपार, दमदम भागात राहते. तिने क्राइस्टचर्च गर्ल्स स्कूल मधून शिक्षण घेतलं आहे.
महाअंतिम सोहळ्याला खास पाहुण्यांनी लावली होती हजेरी
‘इंडियन आयडल’च्या १५व्या पर्वाचं परीक्षण करण्याची जबाबदारी श्रेया घोषाल, बादशाह आणि विशाल ददलानी यांनी उत्तमरित्या पेलली. तर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा आदित्य नारायणने सांभाळली. ‘इंडियन आयडल’च्या १५व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची थीम ९०चं दशक होती. त्यामुळे रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि मिका सिंह खास पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते.