‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’मध्ये काही दिवसांपासून नवा अध्याय सुरू झाला. निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ, विचारी, मार्मिक प्रश्नांनी मोठ्यांना अचंबित आणि निरूत्तर करणारी इंदू आता मोठी झाली आहे. मोठी इंदू नव्या आव्हानांचा सामना करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कांची शिंदेने मोठी इंद्रायणीची भूमिका साकारली आहे. याच कांचीने संतोष जुवेकरसह काम करण्याचा अनुभव सांगितला.

नुकताच कांची शिंदेने ‘मीडिया टॉक मराठी’ या युट्यूब चॅनेशली संवाद साधला. यावेळी तिला संतोष जुवेकरबद्दल विचारलं. तसंच तो मालिकेत पुढे दिसणार की नाही? असंही विचारलं. तेव्हा कांची म्हणाली, “मालिकेतील ते पुन्हा दिसणार आहेत की नाही हे मी सांगणार नाही. पण, त्यांची ऊर्जा खूप सकारात्मक आहे. एकतर विठ्ठूरायला रिप्रेझेंट करणार पात्र हे कसं असू शकतं? ते हे स्वीकारणं, आपल्याला कोणी दुसरं असतं तर अवघड झालं असतं. पण, त्यांच्या चेहऱ्यामध्ये इतकं प्रेम आहे, इतकी आपुलकी आहे. इतकं तेज त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. कारण त्यांनी इतकं काम केलं आहे. इतक्या लोकांना त्यांनी समजलं आहे. इतकी पात्र त्यांनी समजली आहेत. म्हणून त्यांना कुठेतरी एक कामाचा नळकत आलेला ऑरा आहे. जो जाणवतो.”

“जेव्हा संतोष जुवेकर आजूबाजूला असतात तेव्हा एक आनंदी वातावरण असतं. मजा, मस्ती सुरू असते. कोणाला कामाचा लोढ नसतो. त्यामुळे छान काम होतं आणि वेळेत काम होतं. ते शाबासकीची धापही देतात. जाता जाता मला असं झालं होतं की, खूप मोठा माणूस आहे. खूप मोठे कलावंत आहेत. पण, त्यांनी जाताना मला जवळ घेतलं आणि म्हणाले, लढ आता. तुझी वेळ आहे. असं म्हणून ते गेले. हे माझ्या लक्षात आहे. विनोद दादांनंतर ही प्रोत्साहन देणारी पहिली थाप होती,” असं कांची शिंदेने म्हणाली.

दरम्यान, कांची शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कांचीने ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत चमकीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. कांची सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ती लावणी वर्कशॉप घेते. कांचीने अनेक लावणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या लावणी आणि अदांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे.