Prajakta Mali : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. या विनोदी कार्यक्रमाचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे हास्यजत्रेचे कलाकार अनेकदा परदेश दौऱ्यावर जाऊन तेथील चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक नवीन ओळख मिळाली. या कार्यक्रमातील कलाकारांसह या शोचे परीक्षक आणि निवेदिका यांचीही सर्वत्र चर्चा असते.
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे प्रसिद्ध मराठी कलाकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तर, अभिनेत्री प्राजक्ता माळी या शोची निवेदिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या टीमचा अविभाज्य भाग आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर प्राजक्ताला सुद्धा हास्यजत्रेच्या निमित्ताने एक नवीन ओळख मिळाली. तिचं ‘वाह दादा वाह’सारखे नवनवीन डायलॉग बोलणं, खळखळून हसणं या गोष्टी प्रेक्षकांना भुरळ पाडतात. अभिनेत्रीच्या याच हटके अंदाजाची हुबेहूब नक्कल एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने केली आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पूजा दलालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने यामध्ये प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल केल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये पूजा, सेम टू सेम प्राजक्तासारखी हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘वाह दादा वाह’, ‘वाह गौऱ्या’, ‘म्हणजे नाही रे नाही…’, ‘बरं बरं बरं…’ असे प्राजक्ताचे हास्यजत्रेतील गाजणारे डायलॉग पूजा या व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पूजाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, अमृता खानविलकर, सौरभ चौघुले, निखिल बने, स्वप्नील राजशेखर या सगळ्या कलाकारांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याशिवाय नेटकऱ्यांनी “अगं बाई भारी जमलंय”, “बहारदार परफॉर्मन्स”, “सोनी टीव्ही मराठीकडून तुम्हाला मानाचा मुजरा!”, “प्राजक्ता माळीला टॅग करा कुणीतरी”, “भारी…”, “वाह दादा वाहचा लूप संपतच नाहीये…कमाल” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.