International Women’s Day 2025: दरवर्षीप्रमाणे यंदाही आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून कलाकार महिला दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. केदार शिंदे, सलील कुलकर्णी, मधुराणी प्रभुलकर, मीरा जोशी, सुमीत पुसावळे, पंढरीनाथ कांबळे अशा बऱ्याच कलाकारांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महिला दिनानिमित्ताने अभिनेत्री विशाखा सुभेदारने महिला चालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. ती काय म्हणाली? जाणून घ्या…
अभिनेत्री विशाखा सुभेदारने महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. “स्टीयरिंग व्हील समोर बसणं हे पॅशन आणि जबाबदारीचं काम आहे. ते आपण स्त्रिया नक्कीच करू शकतो!…चलते राहो, आगे बढते राहो…जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा”, असं कॅप्शन लिहित विशाखाने एक स्वतःच्या व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून विशाखाने महिला गाडी चालकांना सल्ला दिला आहे.
विशाखा सुभेदार म्हणाली, “महिला गाडी चालक असल्यामुळे पुरुष हलक्यात घेतात. पुरुषांचा अहंकार दुखावतो. ही काय मला क्रॉस करणार असं त्यांना वाटतं. एकदा मी शूटिंगला निघाले होते. तेव्हा माझ्या मागे स्कॉर्पियो होती आणि माझी नॅनो होती. तर माझ्या नॅनोने त्या स्कॉर्पियोला ओव्हर टेक केलं. त्यात नॅनो गाडीत एक महिला चालवतेय. हे बघू त्या स्कॉर्पियोवाल्याचा इतका इगो हर्ट झाला की, ती कशी मला ओव्हर टेक करू शकते. तर त्याने मला पुढे ओव्हर टेक करून कट मारून एका सिग्नलला जिंकल्यासारख्या अविर्भावात उभा राहिला. मी गाडीची काच खाली केली आणि त्याला म्हटलं एक मिनिटं बोलायचं आहे. मी म्हटलं, अरे तुम्ही अजून इथेच आहात. मला वाटलं आईच्या गावात पोहोचला असाल. त्यामुळे काही नाही गाडी मस्त चालवत राहा. हलक्यामध्ये कोणी घेतलं तर त्याला धडा शिकवा.”
पुढे विशाखा सुभेदार म्हणाली की, ड्रायव्हिंग जिचा आवडता छंद आहे, त्या महिलांनी सजगतेने गाडी चालवा. लोकांना नडेलं असं वागू नका. सुरक्षित गाडी चालवा. हल्ली मी कितीदा तरी बघते की, कॅब चालक महिला आहेत. त्यांच्यासाठीही व्यवसायाचं वेगळं दालन उघडलं आहे. छान वाटतं. काही वर्षांपूर्वी माझी खूप इच्छा होती अजूनही आहे की, मी महिलांची फौज घेऊन शूटिंगला जाईन. म्हणजे माझी लेडी ड्रायव्हर असेल, माझी लेडी मेकअर आर्टिस्ट असेल, हेअरस्टाइल असेल, स्पॉट गर्ल असेल अशी महिलांची फौज घेऊन फिरायाची खूप इच्छा आहे.
विशाख सुभेदारच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं की, महिलांचे नेतृत्व आहे. पण ते सन्मानासहित मान्य करायला हवे…महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “गाडी चालवताना मस्त दिसते आहेस ताई.”