अभिनेत्री ईशा केसकर ‘जय मल्हार’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. ‘जय मल्हार’मध्ये तिने साकारलेल्या ‘बानू’ या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मात्र, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यामध्ये अभिनेत्रीने खलनायिकेची भूमिका साकारल्याने तिला सामान्य नागरिकांमध्ये वावरताना अनेक विचित्र अनुभव आले होते. ईशाने यासंदर्भात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
ईशा केसकर ‘संपूर्ण स्वराज’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी एकाच वाहिनीवर दोन मालिका केल्या होत्या आणि दोन्ही मालिकांमध्ये मी नायकाच्या दुसऱ्या बायकोची भूमिका केली होती. त्यातील ‘बानू’ पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मात्र, शनायाच्यावेळी अगदी उलट अनुभव आला.”
हेही वाचा : “१२५ ते १०० किलो…”, ‘बिग बॉस’ फेम पारस छाबराने कसं कमी केलं वजन? शेअर केलेल्या फोटोंची चर्चा
ईशाने पुढे म्हणाली, “शनायाचा सामान्य लोक प्रचंड तिरस्कार करायचे. मी एकदा शूटिंग संपवून ठाण्याला रात्री भाजी घेत होते. त्यादिवशी मी प्रचंड दमले होते. अशातच एक बाई माझ्याजवळ आल्या…त्यांनी माझ्या हाताला मागून धरलं आणि मला रस्त्यावरच जोरात एक फटका मारला.”
हेही वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या कमाईत घट; आठवड्याभरातही १०० कोटींचा टप्पा पार करणं ठरलं कठीण
“मला सुरुवातीला काहीच सुचले नाही. मी त्यांना काही विचाराच्या आत त्या म्हणाल्या अगं कुठे फेडशील हे पाप? त्या राधिकाला किती त्रास देतेस? तुला आयुष्यात दुसरी काही कामं आहेत की नाही? मी त्यांना काय बोलू हे मला सुचत नव्हतं. एकंदर काय तर लोकं मालिकांना ख-या आयुष्याचा भाग समजतात.” असे ईशाने सांगितले. तसेच खलनायिकेची भूमिका करताना असे अनेक अनुभव आल्याचे तिने नमूद केले.