बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा जलवा अजूनही कायम आहे. त्यांना ही नावं आणि प्रसिद्धी इतक्या सहजासहजी मिळाली नाही. बिग बींना करिअरच्या सुरुवातीपासूनच खूप संघर्ष करावा लागला. या सिनेसृष्टीत त्यांना जवळपास पाच दशक पूर्ण झाली आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनैगा करोडपती सीझन १५’ मुळे चर्चेत आहेत. बच्चन यांचा हा क्वीज शो गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘कौन बनैगा करोडपती सीझन १५’च्या ९६ भागात क्रिकेटर इशान किशन आणि महिला क्रिकेटर स्मृती मंधाना सहभागी झाले आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये इशान किशन अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे.
‘कौन बनैगा करोडपती सीझन १५’मधील इशान किशन आणि अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ ‘सोनी टीव्ही ऑफिशयल’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये इशान अमिताभ बच्चन यांना पत्नी जया बच्चन यांच्याविषयी प्रश्न विचारताना दिसत आहे. इशान सर्वात आधी पर्याय सांगतो आणि मग तो बिग बींना प्रश्न विचारतो.
या व्हिडीओमध्ये इशान बिग बी म्हणतो, “तुमच्याकडे चार पर्याय आहेत.” यावर अमिताभ म्हणतात, “पण प्रश्न काय आहे?” इशान म्हणतो, “प्रश्न नंतर विचारणार. पहिल्यांदा पर्याय सांगणार.” बिग बी म्हणतात, “ओके.” इशान पर्याय सांगत म्हणतो, “पहिला पर्याय- खुदा गवाह, दुसरा पर्याय- सरकार, तिसरा पर्याय – डॉन… हे सर्व तुमचे चित्रपट आहेत. चौथा पर्याय आहे, शहंशाह. आता प्रश्न असा आहे की, जया यांच्या नावाच्या पुढे तुम्ही तुमच्या कुठल्या चित्रपटाचं टायटल लावू इच्छिता?” इशानचा हा प्रश्न ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो.
या प्रश्नाचं उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणतात, “भाई साहब. यात काही शंका नाही. माझ्या पत्नीच्या नावापुढे सरकार हेच टायटल आलं पाहिजे. इथे उपस्थितीत असलेल्या विवाहित पुरुष मंडळी देखील पत्नीच्या नावापुढे हेच टायटल लावतील. बरोबर? असो एक पत्नी संपूर्ण घर सांभाळते. त्यामुळे तुम्हाला तिच्या पुढे झुकायलाच पाहिजे. ती सरकार आहे.” बिग बीचं हे उत्तर ऐकून इशान म्हणतो, “तुमच्याकडून हा सल्ला मिळाल्याने मला आनंद झाला.”
हेही वाचा – सावनीच्या तमाशानंतर मुक्ता भर मंडपात सागरबरोबर मोडणार लग्न; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट
दरम्यान, इशान आणि बिग बींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच लाइक्सच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं आहे.