Jahnavi Killekar & Gautami Patil Dance Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरांत लोकप्रिय झाली. तिने आजवर छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘बिग बॉस’मुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तिने प्रत्येक टास्क जिद्दीने परफॉर्म करत, महाअंतिम फेरी गाठली होती. आता शो संपल्यावरही तिची लोकप्रियता कायम आहे यामुळेच अनेक कार्यक्रमांना जान्हवीला विशेष पाहुणी म्हणून निमंत्रित केलं जातं. तिचा चाहतावर्ग आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात आहे.
जान्हवीने नुकतीच एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीची भेट प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलशी झाली. गौतमी आणि जान्हवी एकाचवेळी रंगमंचावर आलेल्या पाहून चाहत्यांनी दोघींना एकत्र डान्स करण्याची विनंती केली.
कारण, जान्हवी उत्तम अभिनेत्री आहेच पण, याचबरोबर ती जबरदस्त डान्स सुद्धा करते. जान्हवी यापूर्वी काही लोकप्रिय कोळीगीतांमध्ये सुद्धा झळकली आहे. याशिवाय ‘बिग बॉस’मध्ये असताना जान्हवी आणि सूरजचा “कोंबडी पळाली…” गाण्यावरील डान्स सर्वत्र व्हायरल झाला होता. यामुळेच जान्हवीला चाहत्यांनी गौतमीबरोबर लाइव्ह कार्यक्रमात डान्स करण्याची विनंती केली.
गौतमी आणि जान्हवी एकत्र रंगमंचावर आल्याचं पाहून ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’ हे गाणं लागलं. दोघींनी काही सेकंदातच या गाण्यावर ठेका धरून जबरदस्त डान्स केला. जान्हवी आणि गौतमीची या गाण्यावर डान्स करतानाची एनर्जी पाहण्यासारखी होती. यानंतर उपस्थितांनी सुद्धा या दोघींचं अप्रतिम डान्ससाठी कौतुक केलं.
सध्या गौतमी आणि जान्हवी एकत्र डान्स करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, गौतमी पाटीलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ती टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून ती छोट्या पडद्यावर झळकणार आहे. हा कुकिंग शो २६ एप्रिलपासून सुरू होणार असून या शोचा होस्ट लोकप्रिय मराठी अभिनेता अमेय वाघ असणार आहे.
तर, अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतली होती. याशिवाय नुकतीच ती सूरज चव्हाणच्या “वाजीव दादा” गाण्यात पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे.