Jahnavi Killekar Met Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक एकमेकांना भेटताना दिसत आहेत. नुकतीच इरिना रुडाकोवा धनंजय पोवारच्या घरी गेली होती. त्यानंतर आता जान्हवी किल्लेकरने या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची त्याच्या गावी जाऊन भेट घेतली आहे. सूरज चव्हाणने त्याच्या अकाउंटवरून या भेटीचे फोटो शेअर केले आहे.
सूरज चव्हाण व जान्हवी किल्लेकर दोघेही बिग बॉसच्या घरात ७० दिवस राहून ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. जान्हवीने सहाव्या क्रमांकावर असताना ९ लाख रुपये घेऊन हा खेळ सोडला होता, तर सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. आता फिनालेनंतर जवळपास २० दिवसांनी ‘किलर गर्ल’ जान्हवी अन् सूरजची भेट झाली.
‘लाडकी माझी ताई’ असं कॅप्शन देत सूरजने हे फोटो शेअर केले आहे. यात जान्हवीने काठापदराची सुंदर साडी नेसली आहे. दोघांनी बरेच फोटोही काढले आहेत.
सूरज चव्हाणने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘अभिनंदन सुरज भाऊ मोठ्या अभिनेत्रीला बहिणीचा दर्जा दिला. यातून मराठी माणसाची संस्कृती दिसते,’ ‘सूरज तू फक्त बिग बॉस जिंकला नाहीस सर्वांची मनंही जिंकली आहेस….. मग ते बिग बॉसचे घर असो किंवा पूर्ण महाराष्ट्र असो.. जे नाते जोडले आहे ते सदैव असेच राहावे…पॅडीदादा सोबतचे नाते तर अजून भारी वाटते…’, ‘बहीण भाऊ जोडी एक नंबर’, ‘खेळाच्या पलीकडे नाती जपलीत यांनी, अशीच मैत्री राहूदे तुमची…आवडलं आपल्याला’, ‘दिवस सगळ्यांचे बदलतात फक्त संयम ठेवला पाहिजे…याच उत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण’ अशा कमेंट्स सूरज व जान्हवीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा – ‘धर्मवीर २’ OTTवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या
दरम्यान, बिग बॉस विजेता सूरज चव्हाण लवकरच ‘झापूक झुपूक’ नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये सूरज चव्हाणला मुख्य भूमिकेत घेऊन हा चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली.
© IE Online Media Services (P) Ltd