अभिनेत्री जान्हवी किल्लेकर(Jahnavi Killekar) कलर्स मराठीच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. त्यावेळी तिच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत होते. त्यानंतर ती बिग बॉस मराठी ५ च्या पर्वात सहभागी झाली. मात्र, वर्षा उसगांवकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. मात्र, तिच्याबरोबरच तिच्या कुटुंबालादेखील ट्रोल केले गेले. आता बिग बॉस मराठी ५ च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने याबाबत वक्तव्य केले आहे.
“माझ्यासाठी तो परफेक्ट आहे”
जान्हवी किल्लेकरने बिग बॉस मराठी ५ नंतर ‘मीडिया टॉक मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या नवऱ्याला केलेल्या ट्रोलिंगबद्दल बोलताना म्हटले, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर दु:ख झालं. माझ्यामुळे माझं कुटुंब, जाऊबाई, सासू, नवरा, आई-वडील, मुलगा ट्रोल झाले. मला हे म्हणायचं आहे की, माझी चूक आहे. मी चुका केल्यात, तर मला बोला; त्यांना नका बोलू. त्यांची काहीच चूक नाही. माझ्या नवऱ्याला इडलीवाला वगैरे म्हटले गेले. का एखाद्याच्या दिसण्यावर बोलावं? माझा स्वभाव तसा नाहीये. मी माणसाचं दिसणं बघून प्रेम करीत नाही. तो माणूस किती हुशार आहे किंवा तो काय करू शकतो, या दृष्टिकोनातून मी लोकांकडे बघते. आतापर्यंत एखादा माणूस दिसायला सुंदर, हॅण्डसम आहे म्हणून मला कधी प्रेम झालं नाही. तो माणूस म्हणून कसा आहे, तो माझ्यासाठी काय करू शकतो, हे बघून मला त्याच्यावर प्रेम झालेलं आहे. आमचं प्रेम आहे. ती माझी निवड आहे.”
“मला माहितेय की, माझा निर्णय चुकला नाही. तुम्ही का जज करताय? भलेही तो हॅण्डसम नसेल. मी मान्य करते की, तो सावळा आहे, काळा आहे; पण माझा आहे. माझ्यासाठी तो परफेक्ट आहे. मला झेलणं सोपं काम नाहीये. तो घरात मला आणि आमचा मुलगा, अशा दोन लहान मुलांना सांभाळतो”, असे म्हणत नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीने उत्तर दिले आहे.
दरम्यान, जान्हवीने बिग बॉसच्या घरात तिच्या चुका लक्षात आल्यानंतर आपल्या वागण्यात आणि खेळात बदल केल्याचे पाहायला मिळाले होते.