Jahnavi Killekar And Nalinee Mumbaikar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरांत चर्चेत आली. हा शो संपल्यावरही या ‘किल्लर गर्ल’ची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. नुकतीच तिची ‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री झाली आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये जान्हवीने सूरज चव्हाणच्या मोढवे गावी तसेच घन:श्यामच्या वाढदिवसाला सुद्धा उपस्थिती लावली होती. आता ही अभिनेत्री सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर नलिनी काकूंच्या घरी पोहोचली आहे.
नलिनी मुंबईकर यांना घराघरांत ‘नलिनी काकू’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या हातचे मच्छीचे पदार्थ, त्यांचे मसाले, नलिनी काकूंची जेवण बनवण्याची पद्धत या सगळ्या गोष्टींची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. त्यांचं जेवण पाहून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. तशा कमेंट्स सुद्धा नलिनी काकूंच्या व्हिडीओवर असतात. नुकतंच त्यांनी अलिबागला स्वत:चं हॉटेल देखील सुरू केलेलं आहे. जान्हवी किल्लेकरने अलीकडेच या हॉटेलला भेट दिली.
हेही वाचा : लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”
जान्हवी पोहोचली नलिनी काकूंच्या घरी
जान्हवी काकूंना भेटण्यासाठी अलिबागला गेली होतीय अभिनेत्रीने नलिनी काकूंच्या किचनमध्ये एन्ट्री घेऊन, “आज माझ्यासाठी स्पेशल काय बनवताय” असा प्रश्न त्यांना विचारला. यावर काकू म्हणाल्या, “तुझ्यासाठी मी आज खास ‘Banana Leaf पापलेट’ बनवणार आहे.” यानंतर या दोघी मिळून स्वयंपाक घरात चुलीवर पापलेट बनवत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याची संपूर्ण रेसिपी त्यांनी या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. पापलेट बनवताना जान्हवीने काकूंना मदत केली.
‘Banana Leaf पापलेट’ तयार झाल्यावर जान्हवीने याचा नलिनी काकूंसमोरच आस्वाद घेतला. यावेळी ‘खूपच सुंदर झालंय’ अशी प्रतिक्रिया देत अभिनेत्रीने नलिनी काकूंचं कौतुक केलं. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, जान्हवी किल्लेकर आणि नलिनी काकू या दोघींना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर, “खूपच सुंदर”, “आता जान्हवी हळुहळू फेव्हरेट होत चाललीये”, “तोंडाला पाणी सुटले काकू”, “अरे वाह जान्हवी ताई तिकडे पोहोचली”, “दोघींना एक पाहून छान वाटलं” अशा कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.