Devdatta Nage on why he live in Alibaug: ‘देवयानी’, ‘जय मल्हार’, ‘उदे गं अंबे’ अशा मालिकांमधून अभिनेता देवदत्त नागेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘आदिपुरुष’, ‘तानाजी’, तसेच नुकतेच प्रदर्शित झालेले ‘रॉबिनहूड’ आणि ‘देवकीनंदन वसुदेवा’ या चित्रपटांतून अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
मुंबईत काम करीत असूनही देवदत्त नागे अलिबागमध्येच का राहतो?
नुकतीच अभिनेत्याने अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, तू बऱ्याचदा मुंबईत शूटिंग करीत असतोस. तरीही अलिबागलाच का राहतोस? त्यावर देवदत्त नागे म्हणाला, “ती माझी जन्मभूमी आहे. जसं आपण आपल्या कर्मभूमीवर प्रेम करतो, तशी आपली जन्मभूमी विसरून चालत नाही. त्यामुळे माझं पॅकअप सहा-सातला जरी झालं तरी मी अलिबागला जातो.”
तो पुढे म्हणाला, “माझ्या घरचा परिसर, औदुंबर, देव, तिथे एक छोटंसं मंदिर आहे. त्यामुळे तिथे जी सकारात्मकता मिळते, ती खूप महत्त्वाची आहे. जसं मी ‘जय मल्हार’च्या शूटिंगच्या वेळी पॅकअपनंतर माझ्या मनात आलं की, चला आता जेजुरीला जाऊयात. तर मी आणि सेटवरील ज्यांना तिथे जायचे असायचे, ते आम्ही जेजुरीला जायचो. तो सगळा भंडारा अंगाला लागलेला असायचा. मी जेजुरीवरूनच सेटवर जायचो. तिथेच अंघोळ करायचो. कारण- तिकडे जो भंडारा आहे, तो माझ्या सेटवर पडायचा. सेटवरून प्रेक्षकांना ती अनुभूती मिळावी. तसेच अलिबागहून निघताना घरातील देवांची पूजा करून निघतो. त्यांना सांगतो की, मी चांगल्या कामासाठी निघतोय, माझ्या पाठीशी राहा.”
तसेच अभिनेत्याने या मुलाखतीत त्याचा संघर्षाचा काळ, ‘आदिपुरुष’मध्ये काम करण्याचा अनुभव, प्रभासबरोबरचे बॉण्डिंग, दाक्षिणात्य चित्रपटांमुळे तिथल्या प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम, तो टॉलीवूडमध्ये काम करतो; पण मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही, टेलिव्हिजनवरचे त्याचे प्रेम, त्याची आवडती गाडी विकावी लागली तो प्रसंग अशा अनेक गोष्टींबाबत देवदत्त नागेने वक्तव्य केले आहे.
देवदत्त नागेची ‘देवयानी’ मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली. ‘जय मल्हार’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. नुकताच तो ‘उदे गं अंबे’ या मालिकेत काम करताना दिसला. आता तो आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.