Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला आहे. मात्र या पर्वात सहभागी झालेले सदस्य सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. या पर्वात काही सदस्यांची मैत्री, भांडणे मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली. त्यापैकी एक जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी यांची मैत्री आहे. आता निक्की तांबोळी(Nikki Tamboli)ने एका मुलाखतीत जान्हवी किल्लेकरबद्दल वक्तव्य केले आहे.

जान्हवी किल्लेकरच्या मैत्रीवर काय म्हणाली निक्की तांबोळी?

निक्की तांबोळीने नुकतीच ‘मराठी टीव्ही मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत, तिला विचारले ‘बिग बॉस १४’मध्ये तू सहभागी झाली होतीस त्यावेळी तुझी रुबीनाबरोबर मैत्री दिसली होती. बिग बॉस मराठीमध्ये जान्हवीबरोबरदेखील तशीच मैत्री सुरुवातीला दिसली होती. मात्र नंतर खटके उडाले. त्यावर काय सांगशील?या प्रश्नाचे उत्तर देताना निक्कीने म्हटले, “जान्हवी खरंच खूप प्रेमळ मुलगी आहे. मला तिची सोबत खूप आवडते. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून आम्ही सोबत होतो. पण तिला भाऊच्या धक्क्यावर असं बोललं गेलं की ती माझी सावली आहे. जी ती नाहीये. तिलासुद्धा तिचे स्वतंत्र व्यक्तीमत्व दाखवायचे होते. त्यामुळे तिने मैत्रीमधून माघार घेतली आणि ती एकटी खेळायला लागली. पण आम्ही इतक्या दिवस एकत्र खेळत होतो, त्यामुळे आम्हाला एकमेकींबद्दल आत्मियता होती. आमच्या लक्षात आलं की जर ही आत्मियता दिसत असेल तर दिसू दे. आम्ही आमच्या भावना लपवणार नाही. मग आमच्यात परत मैत्री झाली. कालच जान्हवीबरोबर माझे बोलणे झाले. ती मला भेटायला येणार आहे.”

हेही वाचा: सूरज चव्हाण विजेता होण्यास पात्र होता का? निक्की तांबोळी म्हणाली, “पहिल्या दिवसापासून पाहायचं झाल्यास..”

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरात दोन गट पडले होते. निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल हे एका गटात होते. जान्हवी आणि निक्की यांच्यामध्ये चांगली मैत्री पाहायला मिळत होती. मात्र काही काळानंतर त्यांच्यात फूट पडली आणि ए ग्रुप संपुष्टात आला. त्यानंतर निक्की आणि जान्हवी यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. आता बिग बॉसच्या घराबाहेर त्यांची मैत्री दिसणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, निक्की तांबोळी ‘बिग बॉस १४’ मध्ये सहभागी झाली होती. तेव्हा सुरुवातीच्या काळात रुबीना दिलैकबरोबर भांडणे झाली होती मात्र नंतर त्या दोघींमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळाली होती.