Bigg Boss Marathi 5 च्या घरात सहभागी झालेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहिली. निक्की तांबोळीबरोबर असलेली मैत्री, वर्षा उसगांवकरांचा केलेला अपमान, पंढरीनाथ कांबळेबाबत केलेले वक्तव्य, ग्रुपमधून बाहेर पडत एकटीने खेळण्याचा घेतलेला निर्णय, निक्कीबरोबरचे शत्रुत्व, वैभव चव्हाणबरोबरची मैत्री, वर्षा उसगांवकरांच्या मनात स्वत:साठी निर्माण केलेली जागा, टास्कमध्ये केलेली कामगिरी यामुळे जान्हवी किल्लेकर सातत चर्चेत राहिली. तिच्या चांगल्या-वाईट वागण्यावर प्रेक्षकांसह कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. आता जान्हवी आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
‘बिग बॉस मराठी ५’ मधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीने मुलाखतींमधून विविध विषयांवर गप्पा मारल्या आहेत. तिने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत संग्राम चौगुलेबरोबरच्या मैत्रीवर वक्तव्य केले आहे. जान्हवी किल्लेकरने म्हटले, “संग्राम चौगुले खूप हसवायचे मला. तो काळ असा होता की मी ए ग्रुपमध्ये नव्हते आणि बी ग्रुपमध्येसुद्धा नव्हते. मी एकटी होते. त्यांना ते कळत होतं. एकटीच आहे बिचारी, एकटीच बसली आहे, त्यामुळे ते यायचे आणि मला हसवायचे. आमचं बोलणं जगावेगळचं काहीतरी असायचं. शेवटच्या दिवशी, ज्यावेळी ते बिग बॉसच्या घराबाहेर जात होते, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, जान्हवी तू अजून माझी मैत्रीण नाहीयेस, मैत्री करायला अजून खूप वेळ आहे, तू इथे स्पर्धक आहेस. असं त्यांनी मला म्हटलं होतं.”
“हे मला आवडत नव्हतं”
पुढे बोलताना जान्हवीने म्हटले, “ते नेहमी मला अन्नपूर्णा म्हणून हाक मारायचे. तू मला जेवण बनवून देतेस, त्यामुळे तू अन्नपूर्णा आहेस, असं ते मला म्हणायचे. ते एक छान बॉन्डिंग होतं. मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही हा शो सोडून जा. तुम्ही मला या घरात नकोय. कारण- इतक्या मोठ्या लेव्हलचा एक माणूस अशा पद्धतीने ट्रोल होतोय, अपमानित होतोय हे मला नको होतं. त्या माणसाने भारतासाठी बरेच मेडल आणलेत. अशा माणसाचा बिग बॉसच्या घरात अपमान होतोय, हे मला आवडत नव्हतं. म्हणून मी स्वत: त्यांना म्हणत होते की तुम्ही जा. नका थांबू. बस ही मैत्री होती”, असे म्हणत जान्हवीने संग्राम चौगुलेबरोबरच्या मैत्रीवर वक्तव्य केले आहे.
दरम्यान, संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाला होता. मात्र वैद्यकीय कारणांमुळे तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले होते.