Bigg Boss Marathi ५ व्या पर्वाने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या पर्वात सहभागी झालेले स्पर्धक अजूनही चर्चेत आहेत. रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेले हे पर्व ७० दिवसांत संपले. आता यामधील स्पर्धक विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. आता जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar)ने निक्की तांबोळीविषयी वक्तव्य केले आहे.
जान्हवी किल्लेकरने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी तिने निक्की तांबोळीच्या खेळाविषयी आणि मैत्रीबाबत तिचे मत व्यक्त केले. आता निक्की आणि तुझ्यामध्ये मैत्री आहे का? बाहेर आल्यावर ती मैत्री असणार आहे का? की मनात तिच्याविषयी नाराजी आहे. यावर बोलताना जान्हवी किल्लेकरने म्हटले, “थोडीफार नाराजी आहे, पण जरा शांतपणे विचार केला तर तो गेम होता. निक्की आधीच बिग बॉस खेळून आलेली मुलगी आहे.”
काय म्हणाली जान्हवी?
“निक्कीला मी खूप जवळून ओळखले आहे, ती चांगली मुलगी आहे. आता शोमध्ये ती तशी वागली आहे, तो तिचा गेम असेल, मला माहीत नाही. पण, ती मैत्री निभावण्याच्या बाबतीत कमाल आहे. तिने माझ्यासाठी खूप काही केले आहे. जेव्हा घरात पत्रकारांशी संवाद झाला होता, त्यावेळी आमच्यात शत्रुत्व होतं, पण मी तिच्याबद्दल वाईट काहीच बोलले नाही. मी चुकीची होते असं मी सांगितलं. ती चांगली आहे, तिने माझ्यासाठी सगळं केलं. तिने माझे पाय दाबून दिले, त्यामुळे मैत्री निभावण्यात ती चांगली आहे, असं मला वाटतं”; असे म्हणत निक्की तांबोळी मैत्रीण म्हणून चांगली आहे, असे मत जान्हवीने व्यक्त केले आहे.
पुढे ती म्हणते, “ज्या वेळी मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले, त्यावेळी मी तिला वचन देऊन आले आहे की, माझ्याकडून ही मैत्री शंभर टक्के निभावेन. कारण आमचं घरदेखील अगदी जवळ आहे. तुला कधीही गरज असेल तर चांगल्या गोष्टींसाठी मी कायम तुझ्याबरोबर उभी आहे.”
हेही वाचा: ‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर दीपिका पदुकोणला केलेले ट्रोल; खुलासा करत म्हणाली, “नकारात्मकता चांगली…”
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात अगदी पहिल्या आठवड्यापासून निक्की आणि जान्हवी यांच्यामध्ये चांगली मैत्री झालेली दिसली. मात्र, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला तिच्याच ग्रुपमधील लोक तिच्याबद्दल तिच्यामागे काय बोलतात, हे दाखवले होते. त्यानंतर ए ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला ट्रॉफी घेऊ देणार नाही, असे निक्कीने म्हटले होते. या भांडणानंतर ए ग्रुप संपुष्टात आला. निक्की आणि जान्हवीमध्ये त्यानंतर शत्रुत्व पाहायला मिळाले. आता एका मुलाखतीत जान्हवी प्रेमळ मुलगी असल्याचे निक्कीने म्हटले होते. याबरोबरच अरबाज पटेल, निक्की आणि जान्हवी एकत्र वेळ घालवत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.