टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिचा म्युझिक व्हिडीओ, तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट ही त्या चर्चांमागची कारणे असतात. मात्र, आता जस्मिनच्या डोळ्यांना इजा झाल्यामुळे ती चर्चांचा भाग झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री जस्मिन भसीन सध्या कठीण काळाचा सामना करीत आहे. तिच्या डोळ्यांना इजा झाल्याचे समोर आलेल्या फोटोंमधून दिसत आहे. या फोटोंमध्ये तिच्या डोळ्यांवर बॅण्डेज लावल्याचे पाहायला मिळत आहे. १७ जुलैला ती एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेली होती. त्यावेळी डोळ्यांत लेन्स घातल्यानंतर तिच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला. काही वेळ तिला दिसणे बंद झाले होते. मात्र, लगेच दवाखान्यात न जाता कार्यक्रम संपल्यानंतर ती डॉक्टरकडे गेली. आता तिच्या डोळ्यांतील कॉर्नियाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असून, येत्या चार-पाच दिवसांत ती बरी होईल,असे सांगण्यात आले आहे. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत आपण आता बरे होत असल्याचे म्हटले आहे. जस्मिनच्या चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच काहींनी तिच्याबद्दल काळजीदेखील व्यक्त केली आहे.

दरम्यान, जस्मिन भसीनने एका मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाबाबत वक्तव्य केले होते आणि त्यामुळे ती चर्चेत आली होती. ‘पिंकविला’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल बोलताना तिने म्हटले आहे की, त्यावेळी मी काश्मीरमध्ये होते. तिथे इंटरनेटची समस्या होती. जेव्हा मी विमानतळावर गेले तेव्हा लोक सिद्धार्थच्या निधनाबद्दल बोलत होते. मी जे ऐकत होते, त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण, ज्यावेळी मी मुंबईत आले, त्यावेळी मी सुन्न झाले आणि पुढचे काही दिवस मी सुन्न अवस्थेतच होते. सिद्धार्थ कायमचा गेला आहे, हे मला स्वीकारताच येत नव्हते. त्याच्या जाण्याने मला आयुष्यभरासाठी एक धडा मिळाला की, इथे काहीच शाश्वत नाही. त्यामुळे जेव्हा वेळ असतो, त्यावेळी एकमेकांमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. कारण- वेळेबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते आणि मग आपण पश्चात्ताप करीत राहतो. सिद्धार्थच्या जाण्याने मला धक्का बसला होता, हे सांगताना जस्मिन भावूक झाली होती.

सिद्धार्थ शुक्ला आणि जस्मिन भसीन यांनी ‘दिल से दिल तक’ मालिकेत एकत्र काम केले होते. त्याबद्दल बोलताना अभिनेत्रीने म्हटले आहे की, या मालिकेमध्ये सगळे ज्येष्ठ व अनुभवी कलाकार होते. त्यामुळे मला भीती वाटायची. मात्र, सिद्धार्थमुळे ती मालिका मी करू शकले. त्याने मला खूप प्रोत्साहन दिले, अशी आठवण तिने सांगितली आहे. त्याबरोबरच मालिकेशिवायही आम्ही एकमेकांचे खूप जवळचे मित्र होतो. आयुष्यातील तो एक सुंदर असा काळ होता. मात्र, काही कारणांमुळे आमच्यात गैरसमज निर्माण झाले होते. पण, तो ज्या प्रकारचा होता, विशेषत: स्त्रियांबरोबरच्या त्याच्या वागण्यामुळे माझ्या मनात त्याच्याविषयी कायमच आदर राहील, अशी प्रतिक्रिया जस्मिनने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: प्रसाद ओकने सांगितला आनंद दिघेंची भूमिका साकारतानाचा अनुभव, म्हणाला…

जस्मिन भसीन ‘दिल से दिल तक’ मालिकेत अभिनय करताना दिसली होती. त्याबरोबरच ती ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमांमध्येदेखील दिसून आली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasmin bhasin has now suffered an eye problem corneal damage nsp