‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ बाई गावात’ हा रिअ‍ॅलिटी शो चांगलाच गाजला होता. या अफलातून संकल्पना असलेल्या रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन हार्दिक जोशीने केलं होतं. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर रमशा फारुकीने बाजी मारून ‘जाऊ बाई गावात’ ट्रॉफीवर नाव कोरलं. रमशाला २० लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी देण्यात आली होती. हीच रमशा नुकतीच सीआयडी (CID) मालिकेत झळकली. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका तुफान गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजही बऱ्याच प्रेक्षकांना ‘सीआयडी’ मालिकेचं वेड आहे. मालिकेचे जुने भाग प्रेक्षक आवडीने बघत असतात. सध्या ‘सीआयडी’चं दुसरं पर्व सुरू आहे. याच दुसऱ्या पर्वात ‘जाऊ बाई गावात’ची विजेती रमशा फारुकीने काम केलं आहे. तिने मालिकेतील कलाकारांबरोबर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

रमशा फारुकीने लिहिलं, “मी सध्या ‘नेटफ्लिक्स’वर स्वतःला पाहत आहे. तुम्ही काय करताय?…आज १० वर्षांच्या चिमुकल्या रमशाला खूप अभिमान वाटतं असेल. कारण मी ‘सीआयडी’ मालिका बघत मोठे झाले आणि मी आता बालपणीच्या नायकांना भेटलीच नाहीतर त्यांच्याबरोबर काम केलं आहे…मी माझ्या टिव्हीवर जादूने प्रवेश केल्यासारखं वाटलं…आतापर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘क्राइम पेट्रोल’ अशा आवडत असलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. या यादीत आता ‘डोरेमॉन’ आणि ‘टॉम अँड जेरी’ पण आहे. अजूनपर्यंत मला ‘सीआयडी’मध्ये पाहिलं नसेल तर नेटफ्लिक्सवर जा आणि पाहा. १५ मार्चच्या भागात मी आहे.”

दरम्यान, रमशा फारुकी एक खेळाडू असली तरी तिला अभिनयाची आवड आहे. तिने काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. रमशा बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याबरोबर एका जाहिरातीमध्ये झळकली होती. तसंच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रिपोर्टर रिताच्या भूमिकेत रमशा दिसली होती.