Saorabh Choughule and Yogita Chavan Wedding Photo : कलर्स मराठी वाहिनीवर २०२१ मध्ये ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यामध्ये योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘जीव माझा गुंतला’मध्ये योगिताने अंतरा, तर सौरभने मल्हारचं पात्र साकारलं होतं. घराघरांत अंतरा-मल्हारची जोडी अन् नायिकेची हमसफर रिक्षा लोकप्रिय झाली होती.
छोट्या पडद्यावरील अंतरा-मल्हारची ही लाडकी जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाहसोहळा ३ मार्चला थाटामाटात पार पडला. अचानक लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना सुखद धक्का दिला.
योगिताने या फोटोला “३ मार्च २०२४… आयुष्यभराचा हमसफर” असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये सौरभ योगिताला मंगळसूत्र घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नसोहळ्यात योगिताने लाल रंगाची साडी, हिरवा चुडा, गळ्यात दागिने असा पारंपरिक लूक केला होता. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान करत त्यावर वेलवेटची हिरवी शाल घेतली होती. दोघांचाही हा रॉयल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
दरम्यान, मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच योगिता-सौरभच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. समृद्धी केळकर, कश्मिरा कुलकर्णी, पूर्वा फडके, संग्राम समेळ, प्राप्ती रेडकर यांसह अनेक कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.