‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिका सोडलेल्या काही कलाकारांनी असित कुमार मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री सातत्याने मालिकेच्या निर्मांत्यांवर आरोप करीत आहे. अलीकडेच जेनिफरने घनश्याम नायक म्हणजेच मालिकेतील नट्टू काकांना मिळालेल्या वाईट वागणुकीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
जेनिफर मिस्त्रीने बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते घनश्याम नायक यांच्याशी असित मोदींनी कधीही गैरवर्तन केले नाही. मी तरी त्यांना गैरवर्तन करताना पाहिले नाही. कधी कधी असित मोदी त्यांच्यावर ओरडायचे तो वेगळा विषय आहे, परंतु प्रोडक्शन हेड सुहेल रमानी त्यांच्याशी खूप कठोरपणे वागायचे. अनेकदा त्यांच्याशी गैरवर्तन करायचे, मी अनेकवेळा नट्टू काकांना रडताना पाहिले आहे. मीच नव्हे तर मालिकेत काम करणाऱ्या सर्वांनी त्यांना रडताना पाहिले आहे.”
हेही वाचा : २२ वर्षांनी पुन्हा रिलीज होणार ‘गदर’; निर्मात्यांनी केली खास ऑफरची घोषणा, तिकीट असणार फक्त…
जेनिफर पुढे म्हणाली, “वर्षभर काम केल्यावर एक सुट्टी मागितली तरीही आम्हाला खूप काही बोलले जायचे. मी सेटवर अनेकदा रडले आहे. नट्टू काकांनी याविषयी मोनिकाला सांगितले होते की, सुहेलचा सत्यानाश होईल. त्याच्यावर किडे पडतील…हे सांगताना काका खूप रडत होते. एक दिवसाची सुट्टी मागितल्यावर त्यांना खूप वाईट वागणूक मिळाली होती.”