‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मालिकेतील मुक्ता आणि सागर हो नाही म्हणता म्हणता अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. काही दिवसांपूर्वीचं दोघांचा साखरपुडा, मेहंदी, संगीत मोठा थाटामाटात झाला. सध्या हळद समारंभ सुरू आहे. या सोहळ्यासाठी दादूस म्हणजेच बिग बॉस मराठी फेम संतोष चौधरी आणि अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी हजेरी लावली होती. आता लवकरच सप्तपदीचा समारंभ पाहायला मिळणार आहे,
गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही पाहायला मिळणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागरबरोबरच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत. मुक्ता-सागरच्या लग्नासाठी खास ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली हजेरी लावणार आहेत. याचनिमित्ताने ते सध्या विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन-सायली म्हणजे अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरीने ‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सागर-मुक्ता म्हणजे राज हंचनाळे आणि तेजश्री प्रधान यांच्याबरोबर ऑफस्क्रीन असलेल्या बॉन्डविषयी सांगितलं.
जुई गडकरी म्हणाली, “सागर म्हणजे राज खूप लाजाळू आहे. आधी जेव्हा तो सरावासाठी भेटला होता तेव्हा त्याला मी विचारलं होतं, तू एवढा शांत शांत का असतोस? तसेच तेजश्री आणि माझं बरेचदा ऑफस्क्रीन मेसेजवर बोलणं होतं असतं. कोणत्याही कार्यक्रमाला भेटणं होतं असतं. तसंही आम्ही व्यवस्थित असतो. त्यामुळे मला मालिकेत तिच्याबरोबर सीन करताना मज्जा आली.”
त्यानंतर अमित भानुशाली म्हणाला, “तेजश्री आणि माझं नातं सगळ्यांना माहित आहे. मी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय. आधीच जे अल्फा मराठी होतं तेव्हा आम्ही एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र डान्स केला होता. तेव्हापासून ती माझी मैत्रीण आहे. आम्ही डोंबिवलीकर आहोत. बरेच वर्षांची ओळख आणि मैत्री आहे. सागरला (राज) मी आता भेटलो. सागर खूपच चांगला मुलगा आहे. विनम्र आणि कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहे. आमचं चांगलं ट्यूनिंग जुळलं आहे. आम्हाला एकत्र काम करताना बरं वाटतं.”
पुढे जुईला विचारलं की, तुमच्या (जुई आणि तेजश्री) दोघीत स्पर्धा असेल असं वाटतं. याविषयी काय सांगशील. तेव्हा जुई म्हणाली, “अजिबात नाही. आपण एखादं काम करायला येत असतो. आज आम्ही दोघी एकमेकींना सांभाळून घेत होतो. महत्त्वाचा सीन होता. काम चांगलं व्हावं हा आमच्या दोघींचा हेतू होता.” तसंच यावर अमित म्हणाला, “स्टार प्रवाह हा परिवार आहे. फक्त स्टार प्रवाह नाहीये. परिवारातील सदस्यांप्रमाणेच सगळेजण असतात. प्रेमाने राहतात. त्यामध्ये कोणाची स्पर्धा नसते. कोणाबरोबर कुरघोडी नसते. असं काही नसतं. परिवारात सगळे मिळून हसतं खेळत राहतात.”