कर्जतचा एनडी स्टुडिओ पाहायला गेलेली कॉलेजची एक सामान्य तरुणी ते आजच्या घडीला टीआरपीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय मालिकेची प्रमुख नायिका… हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अपघाताने का होईना तिने या क्षेत्रात आपलं ‘पुढचं पाऊल’ टाकलं अन् ‘ठरलं तर मग’ म्हणत आज ही गुणी अभिनेत्री घराघरांतल्या स्त्रियांची लाडकी ऑनस्क्रीन सूनबाई म्हणून मिरवत आहे. स्वत:च्या खऱ्या नावापेक्षा जुईला सर्वत्र ‘कल्याणी’, ‘सायली’, ‘तन्वी’ अशी ओळख मिळाली आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या जुई गडकरीचा आज वाढदिवस.
जुई मूळची कर्जतची. तिचं प्राथमिक शिक्षण नवी मुंबईत नेरुळ येथे झालं. यानंतर उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयातून जुईने तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. शाळेत असताना जुईला अभ्यासाची फारशी आवड नव्हती. कॉलेजमध्ये तिने अभ्यासापेक्षा जास्त प्राधान्य गाण्यांच्या कार्यक्रमांना दिलं. दहावीत फक्त ५८.८० टक्के गुण मिळाल्याने तिचं विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. प्राण्यांची आवड असल्याने तिला व्हेटर्नरी सर्जन व्हायचं होतं… मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कमी टक्के असल्याने विज्ञान शाखेसाठी जुईला कोणत्याच महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अन् शेवटी जुईच्या आईने तिला कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. बारावीनंतर जुईने ‘BMM in Advertising’ मध्ये पदवी आणि त्यानंतर ‘Advertising in PR’ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या सगळ्यात आपण भविष्यात कधी अभिनय क्षेत्रात येऊ असा विचार देखील तिने केला नव्हता.
हेही वाचा : वयात १८ वर्षांचं अंतर, लग्नाला विरोध ते सहजीवनाची ३५ वर्षे! अशोक व निवेदिता सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी
‘असा’ मिळाला पहिला ब्रेक
जुईच्या एका मैत्रिणीला कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये मालिकेच्या ऑडिशनसाठी जायचं होतं. यावेळी जुई तिच्याबरोबर केवळ स्टुडिओ पाहण्यासाठी गेली होती. तिच्या मैत्रिणीचं सिलेक्शन काही झालं नाही. पण, तिथल्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी जुईला ऑडिशन देण्यासाठी भाग पाडलं अन् तिची ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेसाठी निवड झाली. यामध्ये जुईने ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारली होती. यानंतर जुईने आणखी काही मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारल्या. तेव्हा देखील पुढे याच क्षेत्रात करिअर करायचं असं काहीच जुईचं ठरलं नव्हतं. अखेर २०११ मध्ये प्रसारित झालेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्रीचं नशीब रातोरात पालटलं. यामध्ये तिने साकारलेल्या ‘कल्याणी’ या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला अन् पुढे काही दिवसांतच जुईला छोट्या पडद्यावरची आघाडीची नायिका म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेने सलग ७ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
करिअरच्या शिखरावर असताना ३ वर्षांचा ब्रेक अन् आजारपण
‘पुढचं पाऊल’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर जुई ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाली. ‘बिग बॉस’ या शोनंतर तिने ‘वर्तुळ’ या मालिकेमध्ये काम केलं. उत्तम करिअर सुरू असताना वैयक्तिक आयुष्यात तिला एका गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं. “मला एक आजार झाला नव्हता…ते एक प्रकारचं अनेक आजारांचं मिळून मेन्यू कार्ड होतं” असं जुईने राजश्री मराठीच्या मुलाखतीत सांगितलं होतं. याविषयी अभिनेत्री सांगते, “पिट्यूटरीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमर, मणक्याचा त्रास, थायरॉईडच्या ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या असे बरेच आजार मला एकत्र झाले होते. याशिवाय माझ्या मणक्याचं भयंकर वाटोळं झालं होतं. माझं सुरुवातीला फक्त डोकं दुखायचं, त्यानंतर वजन वाढलं, मासिक पाळीत अडचणी येऊ लागल्या. या सगळ्या आजारांवर मी तब्बल ८ ते ९ वर्षे उपचार घेत होते. अनेक वर्षे औषधोपचार केल्यावर शेवटी मूळ आजाराचं निदान झालं तो आजार होता रूमेटॉइड आर्थरायटिस”
जुईला रूमेटॉइड आर्थरायटिसमुळे कलाविश्वातून जवळपास ३ वर्षांचा ब्रेक घ्यावा लागला. या काळात तिच्या हातातून अनेक कार्यक्रम निसटले. ऑफर्स गेल्या… जिमला जायचं नाही, गाडी चालवायची नाही, जमिनीवर बसायचं नाही, डान्स करायचा नाही अशी सगळी बंधनं डॉक्टरांनी तिला या काळात घातली होती. “वयाच्या २७ व्या वर्षी मला माझ्या डॉक्टरांनी तू आई होऊ शकणार नाहीस असं सांगितलं होतं. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे मी तेव्हा एकटीच गेले होते. त्यामुळे मला ही गोष्ट समजल्यावर काय करावं हे सुचत नव्हतं. शेवटी, डॉक्टरांनी सगळ्या गोष्टी माझ्या आईला सांगितल्या. या गोष्टी स्वीकारणं माझ्यासाठी खरंच खूप कठीण गेलं” असं जुईने सांगितलं. या आजारपणानंतर जुईने हळुहळू स्वत:ची दिनचर्या बदलली, व्यायाम – योगा करणं यावर भर दिला आणि या कठीण प्रसंगातून देवावरच्या श्रद्धेमुळे बाहेर आल्याचं अभिनेत्री सांगते.
‘ठरलं तर मग’मधून पुनरागमन
२००९ ते २०१९ या काळात जुईने सलग १० वर्षे छोट्या पडद्यावर काम केलं. पुढे आजारपणामुळे अभिनेत्रीला ब्रेक घ्यावा लागला. पण, यातून सावरल्यावर २०२२ मध्ये जुईकडे ‘ठरलं तर मग’ मालिकेसाठी विचारणा करण्यात आली. ‘पुढचं पाऊल’नंतर वाहिनीने पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास तिने सार्थकी ठरवला अन् जुईचं पुनरागमन यशस्वी ठरलं! ५ डिसेंबर २०२२ पासून सुरू झालेली ‘ठरलं तर मग’ मालिका गेली दीड वर्षे टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. तीन वर्षांनंतरही प्रेक्षकांनी पुन्हा एकदा प्रेम देऊन त्याच आपुलकीने स्वीकारल्याबद्दल अभिनेत्री कायम कृतज्ञता व्यक्त करते.
हेही वाचा : प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
इंडस्ट्रीत आलेले अनुभव
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निमित्ताने जुईला गेल्या १३ वर्षांत पहिला पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीला आजवर नॉमिनेशनदेखील मिळालं नव्हतं. नुकत्याच कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत जुईने याविषयी सांगितलं. “अनेकदा सहकलाकारांचे नॉमिनेशन फॉर्म हस्ताक्षर चांगलं आहे म्हणून मी भरून दिलेत पण, नॉमिनेशनच्या मुख्य यादीतून माझंच नाव काढल्यामुळे प्रचंड वाईट वाटलंय” असं जुई आवर्जून सांगते. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निमित्ताने तिला पहिल्यांदाच नॉमिनेशन अन् गेल्या वर्षभरात एकूण ६ ते ७ पुरस्कार मिळाले. याशिवाय तिला रंगावरून, उंचीवरून सुरुवातीच्या काळात अनेकदा डिवचलं गेल्याचंही अभिनेत्रीने सांगितलं.
आयुष्यात असे अनेक चढउतार आले तरीही न डगमगता पुन्हा कसं उभं राहायचं हे आपल्याला जुईचा संपूर्ण प्रवास पाहून लक्षात येतं. ‘चंदा’, ‘कल्याणी’पासून सुरू झालेला तिचा प्रवास आता ‘सायली’च्या रुपात अविरतपणे चालू आहे. सगळ्या संकटांवर हसतमुखाने मात करत टेलिव्हिजन विश्वात ‘पुढचं पाऊल’ टाकणाऱ्या या दमदार नायिकेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!