ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ अनेक प्राणीप्रेमी संस्थांकडून व्हायरल करण्यात आला असून संबंधित कंपनी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पाळीव प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेंटरमधील हा धक्कादायक प्रकार पाहून कलाविश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रितेश देशमुख पाठोपाठ अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : तरुणाकडून श्वानाला बेदम मारहाण; व्हायरल व्हिडीओ पाहून रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “याला तुरुंगात…”
“एका स्पा सेंटरमध्ये श्वानाला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अतिशय अस्वस्थ करणारा आहे. मी तो व्हिडीओ पूर्ण पाहू देखील शकले नाही. मारहाण करणाऱ्या त्या मनोरुग्णाला देव चांगलीच शिक्षा करेल…ज्या हातांनी त्याने मुक्या जीवाला मारहाण केली ते हात काही दिवसांत काहीच कामाचे राहणार नाहीत. हा अत्याचार थांबवा, त्या कर्मचाऱ्याला अटक करून कठोर शिक्षा करा. मी आशा करते की, तो श्वान आता सुरक्षित असेल. यापुढे, कृपा करून तुमच्या प्राण्यांना अशा क्लिनिक अथवा स्पा सेंटरमध्ये एकटं पाठवू नका.” असं जुईने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा : “लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत आहे!” अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले…
दरम्यान, नेटकऱ्यांनी देखील या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्स करत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी मुंबई पोलिसांना टॅग करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.