मालिकाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे जुई प्रसिद्धीझोतात आली. जुईची ही मालिका सहा वर्षे चालली. या मालिकेमुळे तिला खूप प्रेम मिळालं. नंतर जुई झी युवावरील ‘वर्तुळ’ या मालिकेत झळकली होती. सलग इतकी वर्षे काम केल्यानंतर जुईने स्वत:साठी ब्रेक घेतला होता. ब्रेकनंतर जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे दमदार कमबॅक केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या टीआरपीच्या अव्वल स्थानी आहे. या मालिकेतील जुईची सायली ही भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. जुईला सगळीकडून इतकं प्रेम मिळत असताना तिच्या आयुष्यात असाही एक काळ येऊन गेला, जिथे तिला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ फेम प्रियांका तेंडोलकरला आवडतो ‘हा’ अभिनेता, म्हणाली, “तो पळून…”

नुकत्याच कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत जुईने तिला रंगावरून, उंचीवरून चिडवण्यात येणाऱ्या अनेक नकारात्मक अनुभवांबद्दल खुलासा केला. जुई म्हणाली, “माझ्या आयुष्यात नकारात्मक अनुभव खूप जास्त आलेत. आता इंटरनेटमुळे आपण बॉडी शेमिंगचा मुद्दा उचलून धरतो. पण, मला माझ्या उंचीवरून, माझ्या रंगावरून अनेकदा बोललं गेलंय. मी ज्याप्रकारे बोलते त्यावरूनही मला चिडवलं गेलंय, मी असं सगळं खूप ऐकलेलं आहे.”

जुई पुढे म्हणाली, “पण जेव्हा एखादी २०-२१ वर्षांची मुलगी असते, ती या फिल्डमध्ये नवीन आलेली असते, तेव्हा तुम्ही तिला तिच्या रंगावरून बोलता, तिच्या दिसण्यावरून बोलता, त्यावेळेस तिला कसं वाटत असेल याचा बोलणारा माणूस कधीच विचार करत नाही आणि मला असं वाटतं की ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुमची ५-१० मिनिटांसाठी चेष्टा होऊन जाते.”

“ए काळी आली काळी आली, कटरस्टॅण्ड म्हणून हिला वापरा वगैरे असं सगळं बोललं गेलंय मला. अशावेळेस मला माझा रंग बदलायची खूप इच्छा झाली आणि त्यानंतर मी काय करावं, तर मी घरी गेले आणि स्क्रब क्रिम जोराजोरात माझ्या चेहऱ्यावर घासली. ते म्हणतात ना, कावळ्याचा कधीतरी छान बगळा होईल असं मला वाटलं होतं. मी खूप घासलं स्क्रब क्रिम चेहऱ्यावर, पण रंग काही बदलला नाही. तेव्हा मी तणावात होते. कारण १०० लोकांच्या युनिटसमोर मला सतत रंगावरून बोललं जात होतं.”

“त्यानंतर चार दिवसांनी माझ्या स्कीनवर प्रचंड पिंपल्स आले, म्हणजे बोट ठेवायला जागा नव्हती इतकी माझी स्कीन कामातून गेली होती. त्यानंतर मला असं वाटलं की, कदाचित आपण परत थोडसं स्क्रब केलं तर हे पिंपल्स जातील. म्हणून मी अजून स्क्रब केलं. मी लोकल पार्लरमध्ये जाऊन वेज पील्स करून घेतली की त्याच्याने तरी पिंपल्स जातील आणि मी गोरी दिसेन. तरीही काही घडलं नाही.”

“तेव्हा एक अशी वेळ आली की जिथे माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवायला जागा नव्हती. मला डॉक्टर म्हणाले की, तुला मेकअप नाहीच करता येणार. कारण आता यापुढे तुला निदान सात-आठ महिने तरी ठीक व्हायला जाणार आहेत आणि तेव्हा माझं शूट सुरू होतं. त्यामुळे मी रोज सेटवर जायचे. तेव्हा माझा पिंपल्सने भरलेला चेहरा मला दिसायचा आणि तरीसुद्धा त्यावर मला मेकअप करायला लागायचा.”

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अपर्णाने साजरी केली वटपौर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली…

“त्यावेळेस मी खूप रडायचे. माझी स्कीन डॉक्टर होती ती मला म्हणाली की, विश्वास ठेव हे अजून वाढणार आहे, पण पाच-सहा महिन्यांनी तुझा चेहरा पूर्ण ठीक होईल आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचदरम्यान मला आईने सांगितलं की, तुला ठरवायचंय आता तुला स्वत:ला स्वीकारायचंय की हे जे इतर लोक बोलतात त्यांचा विचार करत बसायचाय. तेव्हा मी २२ वर्षांची होते आणि मला स्वत:ला स्वीकारणं वगैरे काय असतं हे कळत नव्हत.”

“त्यानंतर मी कुठल्यातरी इव्हेंटला गेले होते. तिथे अचानक मला एक व्यक्ती भेटली, मला त्यांचं नावपण माहीत नाही, कारण ते ओळखीचे नव्हते. ते मला म्हणाले, तू छान काम करतेस आणि स्क्रिनवर छान दिसतेस. त्या बाकीच्या गोऱ्या मुली आहेत ना त्यांच्यापेक्षा तू खूप छान दिसतेस. तुझे फीचर्स खूप छान दिसतात. मग मी घरी आले आणि मी आईला सगळं सांगितलं. तेव्हा मी स्क्रिनवर स्वत:ला नव्याने बघायला लागले. तेव्हा मला असं जाणवलं की, हा मी चांगली दिसते स्क्रिनवर आणि तेव्हा पहिल्यांदा असं मला जाणवलं की, हो मी स्वत:ला स्क्रिनवर आवडतेय आणि मग हळूहळू मला कळायला लागलं की, स्वत:च्या स्कीनमध्ये कंफरटेबल असणं म्हणजे काय असतं किंवा स्वत:ला स्वीकारणं म्हणजे काय असतं. मग मी कधीच प्रयत्न केला नाही स्क्रब लावण्याचा किंवा गोरेपणाचा. फक्त मी एवढाच प्रयत्न करते की, या ज्या नकारात्मक कमेंट्स असतात ना त्यांना आता मी फारशी भीक घालत नाही.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jui gadkari said people teased her from her color being racist said her black and body shamed dvr