Happy Friendship Day 2023 : ‘ठरलं तर मग’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’ या पात्राची प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी जुई गडकरीचा वाढदिवस झाला परंतु, मालिकेच्या शूटिंगमुळे आणि व्यग्र वेळापत्रकामुळे अभिनेत्रीने तिचा वाढदिवस साजरा केला नव्हता. त्यामुळे जुईला वाढदिवसाचे सरप्राईज देण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील महिला कलाकारांनी खास ट्रिपचे नियोजन केले होते.
हेही वाचा : “तुझा अभिमान…”, अभिज्ञा भावेने ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, क्षिती जोगचे कौतुक करत म्हणाली…
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्या अभिनेत्री मिळून जुईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खास कर्जत येथे गेल्या होत्या. या कर्जत ट्रिपचा व्हिडीओ जुईने जागतिक मैत्री दिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या सहकलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये मालिकेत सासूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता दिगे गाडी चालवताना दिसत आहेत.
आपल्या सहकलाकारांबद्दल जुई लिहिते, “काही सरप्राईज खूपच सुंदर असतात. माझा वाढदिवस माझ्या मालिकेतील मैत्रिणींनी साजरा केला. आम्ही कर्जतला फिरायला गेलो होतो. तिथे जाऊन आम्ही भाज्यांची शॉपिंग केली. व्हिडीओ बनवले आणि बरंच काही केलं…लव्ह यू माय गर्ल्स”
नेटकऱ्यांनी जुईच्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी तन्वी असल्याने एका युजरने, “अरे वा ! सासूबाई आणि दुश्मनपण आहे सोबत फिरायला” तर, दुसऱ्या एका युजरने “अरे वाह मस्तच… आपल कर्जत आहेच छान” असे लिहिले आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहे.