‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत सुरुचीसह सुबोध भावे व सुयश टिळक हे दोन अभिनेते प्रमुख भूमिकेत होते. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखेर २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता ‘का रे दुरावा’नंतर तब्बल ८ वर्षांनी ती पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे.
सुरुची अडारकरचं ८ वर्षांनी पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर पुनरागमन होणार आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीनुसार तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून सुरुची पुनरागमन करणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतील भूमिकेसाठी सुरुचीला काहीसा ग्लॅमरस लूक देण्यात आला आहे.
सुरुचीचं पात्र मालिकेत विरोचकाच्या सेवकाशी संबंधित असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अभिनेत्री या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकण्याची दाट शक्यता आहे. ६ जानेवारीला प्रसारित होणाऱ्या भागात सुरुची एन्ट्री घेणार आहे.
दरम्यान, ‘का रे दुरावा’ मालिकेतील सुंदर, सोज्वळ अशा अदिती खानोलकरच्या पात्रानंतर प्रेक्षक सुरुचीच्या नव्या भूमिकेला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री साडेदहा वाजता प्रसारित केली जाते.