सध्या मराठी मालिकाविश्वात नवनवीन मालिका दाखल होतं आहेत. प्रत्येक महिन्याला कोणती ना कोणती वाहिनी नव्या मालिकेची घोषणा करत आहे. त्यामुळे सतत जुन्या मालिका बंद होताना दिसत आहेत. याच मुख्य कारण म्हणजे टीआरपी. कमी टीआरपीमुळे वाहिन्या नवनवीन प्रयोग करत आहेत. पण यामुळे दोन किंवा तीन महिन्यातच मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अंतरपाट’ मालिकेने दोन महिन्यात गाशा गुंडाळला. टीआरपीमुळे १० जूनला सुरू झालेली ‘अंतरपाट’ मालिका २४ ऑगस्टला बंद झाली. आता लवकरच आणखीन दोन लोकप्रिय मालिका ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे.

लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणाऱ्या दोन लोकप्रिय मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील आहेत. एका मालिकेला वर्ष पूर्ण झालं असून दुसऱ्या मालिकेला फक्त नऊ महिने पूर्ण झाले आहेत. अशा या दोन लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा – Video: गणपती विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा जबरदस्त डान्स, दोघेही ढोल-ताशांच्या गजरात झाले तल्लीन

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ऑफ एअर होणाऱ्या एका मालिकेचं नाव आहे ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’, तर दुसऱ्या मालिकेचं नाव आहे ‘निवेदिता, माझी ताई’. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस उतरली होती. सादरीकरण, कथेची मांडणी, कलाकारांचा अभिनय आणि संवाद या सर्व बाबींमुळे ही मालिका लक्षवेधी ठरली. क्राइमवर आधारित असलेल्या या मालिकेत बरेच प्रयोग करण्यात आले. त्यामुळे ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेतील अभिनेता हरिश दुधाडे, रुपल नंद, अश्विनी कासार, चंद्रलेखा जोशी यांनी साकारलेले पात्र घराघरात पोहोचले. एवढंच नव्हे तर या कलाकारांना त्यांच्या पात्राद्वारे ओळखले जाऊ लागले. पण आता ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा – उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणला गिफ्टच्या माध्यमातून दिली मोठी संधी, गायक जाहीर करत म्हणाला, “तुझ्यासाठी आम्ही शिंदेशाही कुटुंब…”

तसंच अभिनेता अशोक फळदेसाई आणि अभिनेत्री एतशा संझगिरी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘निवेदिता माझी ताई’ देखील ऑफ एअर होणार आहे. या मालिकेत भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट दाखवण्यात आली होती. पण आता मालिकेचा ४ ऑक्टोबरला शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप वाहिनीने याबाबत अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.