मराठी मालिकाविश्वात एक दुःखद घटना घडली आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’चा सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशिदेचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. या अपघात तो गंभीर जखमी झाला. गेल्या १० दिवसांपासून तो आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. पण अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली असून त्याचं निधन झालं आहे. त्यामुळे मराठी मालिकाविश्वात शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी गौरवला श्रद्धांजली वाहिली आहे.

‘सोनी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडियावर पेजवरून गौरव काशिदेला श्रद्धांजली वाहिली गेली आहे. ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला आहे. काही जण गौरवला श्रद्धांजली वाहत तर काही जण नेमकं काय झालं विचार आहेत.

हेही वाचा – ‘मुंज्या’ चित्रपटाची १०० कोटींकडे घोडदौड; १६ दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेची निर्मिती, अभिनेत्री मनवा नाईकने गौरवच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने गौरव काशिदेचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “एक मेहनती तरुण मुलगा, जो ‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेमुळे आमच्यात सामील झाला आणि ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला.”

हेही वाचा – अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांच्या मोठ्या लेकाचं झालं निधन, अभिनेते म्हणाले, “मी त्याच्या इतका तिरस्कार…”

“तो २६ वर्षांचा होता. बाईक घेतल्यानंतर आणि आयफोन मिळाल्यानंतर खूप खूश झाला होता. तो त्याच्या कुटुंबातील असा मुलगा होता, जो बदल घडवून आणणारा होता. १० जूनचा तो दिवस. त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, पोस्ट पॅकअप, जेव्हा आम्ही मुंबईकर पावसाच्या आगमनाचा आनंद लुटत होतो. त्यावेळी गौरव वाकोला पुलाजवळ रस्त्याच्या मध्ये उभ्या असलेल्या खासगी बसला जाऊन जोरात धडकला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास १० दिवस तो आयसीयूमध्ये मृत्यूशी संघर्ष करत होता. पण शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि आम्ही गौरवला गमावलं.”

हेही वाचा – Video: जुई गडकरीनं काकांबरोबर गायलं किशोर कुमार व आशा भोसलेंचं लोकप्रिय गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरल

पुढे मनवाने लिहिलं आहे, “पोलिसांनी बस चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बस रस्त्याच्या बाजूला नसून मधोमध उभी असल्याने पोलिसांनी या अपघाताला चालकाला जबाबदार धरलं आहे. पण मुद्दा काय आहे? आम्ही गौरवला गमावलं.”