झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक आहे. २०१६साली प्रसारित झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील शिव व गौरी ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अभिनेता ऋषी सक्सेना व मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव या मालिकेत प्रमुख भूमिकेत होते.
‘काहे दिया परदेस’ मालिकेत शिव हे पात्र साकारुन ऋषी सक्सेना घराघरात पोहोचला. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. मालिकांबरोबरच ऋषीने सिनेमात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘रेनबो’ या चित्रपटांतून ऋषी मोठ्या पडद्यावर झळकला. आता ऋषी सक्सेना हिंदी कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा>> Video: शिव ठाकरेला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी, बॉडीगार्डलाही आवरणं झालं कठीण अन्…; व्हिडीओ व्हायरल
कलर्स वाहिनीवरील ‘सावी की सवारी’ या मालिकेतून ऋषी हिंदी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत असून मानव हे पात्र साकारताना दिसणार आहे. ऋषीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मालिकेचा प्रोमो व्हिडीओ शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याच्या पोस्टवर चाहते व सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ऋषी सक्सेना व अभिनेत्री ईशा केसकर रिलेशनशिपमध्ये आहेत. ऋषी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.